Auto strike: आज रिक्षांचा संप, प्रवाशांची कोंडी होणार; रिक्षा सेवा बंद राहणार
पीएमपीएमएल बस आणि मेट्रोवर प्रवाशांचा भार वाढण्याची शक्यता

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी आज सोमवार (दि. २३) संप पुकारला आहे. त्यामुळे शहरातील रिक्षा सेवा बंद राहणार असून, रोजच्या प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. नोकरदार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना या संपाचा फटका बसू शकतो.
रिक्षा बंद असल्याने प्रवाशांचा भार पीएमपीएमएल बस आणि मेट्रोवर वाढणार आहे. त्यामुळे बसथांबे आणि मेट्रो स्थानकांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रिक्षांचा मोठा वाटा आहे. विशेषतः रेल्वे स्टेशन, मेट्रो स्थानके, बसथांबे, औद्योगिक परिसर आणि रहिवासी भागांना जोडण्यासाठी नागरिक रिक्षांचा वापर करतात. अनेक नोकरदार सकाळी कामावर जाण्यासाठी आणि सायंकाळी घरी परतण्यासाठी रिक्षांवर अवलंबून असतात.
विद्यार्थ्यांनाही शाळा, महाविद्यालये आणि क्लासेसला जाण्यासाठी रिक्षांचा आधार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत रिक्षाचालकांनी एकाच दिवशी संप पुकारल्याने शहरातील दैनंदिन प्रवासाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. रिक्षा संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएल प्रशासनाने शहरातील बससेवा नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे रिक्षांना पर्याय म्हणून बससेवेचा वापर करता येणार आहे. तसेच मेट्रो सेवाही सुरू राहणार असल्याने मेट्रो प्रवाशांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध असेल. मात्र, रिक्षांमधून प्रवास करणारे नागरिकही बस आणि मेट्रोकडे वळल्यास नेहमीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या वाढू शकते. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागू शकते.
शहरातील काही भागांत बससेवेची वारंवारता आणि थेट जोडणी मर्यादित असल्याने रिक्षा हा नागरिकांसाठी सोयीचा पर्याय ठरतो. मात्र, संपामुळे शेवटच्या टप्प्यातील प्रवासासाठीही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मेट्रो स्थानकापासून घरापर्यंत किंवा बसथांब्यापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध नसल्यास पायी चालत जाण्याची वेळ प्रवाशांवर येऊ शकते.
या संपाचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. नियमित तपासणी, उपचार, औषधे घेणे किंवा अन्य वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पर्यायी वाहन शोधावे लागणार आहे. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय परिस्थितीतही वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी शक्य असल्यास प्रवासाचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे.
चालकांकडून अधिक भाड्याची मागणी
दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर काही रिक्षाचालकांकडून शेअरिंग प्रवासासाठी जादा भाडे सांगितले जात असल्याचे समोर आले आहे. निगडी ते पिंपरी या मार्गावर एका प्रवाशाकडून तब्बल ८० रुपये भाडे मागितले जात असल्याची माहिती आहे. नियमितपणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. रिक्षांचा संप असल्याने वाहतुकीचे पर्याय मर्यादित होणार असताना काही चालकांकडून जादा भाड्याची मागणी होत असल्यास प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.
संपाला सकाळी ११ वाजता सुरुवात
पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संपाला सुरुवात होणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. शहरातील सर्व रिक्षाचालकांनी या संपात सहभागी होऊन रिक्षा सेवा कडकडीत बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २३) संप पुकारण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येऊन अभिवादन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. शहरातील सर्व रिक्षाचालकांनी या आंदोलनात सहभागी होऊन रिक्षा सेवा कडकडीत बंद ठेवावी.’ – बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र रिक्षा पंचायत.
Wagholi News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा





