Metro service: तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत
Metro service:

येरवडा स्थानकाजवळ बिघाड; अडीच तास एकाच मार्गिकेवरून वाहतूक
Metro service: तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत- वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा स्थानकाजवळ रविवारी (दि. २२) सकाळी मेट्रोच्या विद्युत पुरवठा प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
बिघाड झालेला मेट्रो रेक मुख्य मार्गिकेवरून बाजूला करण्यासाठी प्रशासनाला सुमारे दोन तासांचा कालावधी लागला. या काळात मेट्रो प्रशासनाने आरटीओ ते रामवाडी या टप्प्यात एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू ठेवली. दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पूर्ववत झाली.
रविवारी सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी येरवडा मेट्रो स्थानकाजवळ एका मेट्रो रेकमध्ये विद्युत पुरवठा प्रणालीशी संबंधित तांत्रिक बिघाड झाल्याने संबंधित रेकची वाहतूक थांबली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली. सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांपासून आरटीओ ते रामवाडी या टप्प्यात एकाच मार्गिकेवरून (सिंगल लाइन ऑपरेशन) दोन्ही दिशांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली.
दरम्यान, मेट्रोच्या तांत्रिक पथकाने बिघाड झालेला रेक मुख्य मार्गिकेवरून रामवाडीच्या दिशेला काढला. दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी तो रामवाडी मेट्रो स्थानकाजवळ सुरक्षितपणे उभा केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत मार्गिका दोनवर दोन्ही दिशांनी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
नेमका कोणता तांत्रिक दोष निर्माण झाला, याची तपासणी मेट्रोच्या तांत्रिक विभागाकडून सुरू आहे. या काळात प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करून सध्या सर्व मार्गांवरील मेट्रो सेवा वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले. रविवार असल्याने अनेक नागरिक खरेदीसाठी बाजारात आले होते. मात्र, मेट्रो सेवेचा खोळंबा झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.





