Elimination of encroachments: उपनगरांत अतिक्रमण निर्मूलनाचा धडाका
Elimination of encroachments:

महापालिकेची एक लाख ८८ हजार चौरस फूट क्षेत्रावर धडक कारवाई
Elimination of encroachments: महापालिकेने रविवारी उपनगरांमध्ये जोरदार अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली. या कारवाईत सुमारे एक लाख ८८ हजार क्षेत्र मोकळे केले. ही कारवाई वानवडी, नगररस्ता-वाघोली, औंध-बाणेर, हडपसर-मांजरी, धनकवडी-आंबेगाव-कात्रज आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत केली.
बांधकाम विभाग, बांधकाम विकास विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत शेड, बांधकामे, स्टाॅल, हातगाड्या आणि अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले.
औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सामासिक अंतरातील जागेवर करण्यात आलेली कच्ची व पक्की अतिक्रमणे, तसेच रस्ते व पदपथांवरील शेतकरी आठवडे बाजारासंदर्भात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत हातगाड्या, काउंटर, रिकामे कॅरेट, तसेच भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
धनकवडी-आंबेगाव-कात्रज क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत स्टॉल, काउंटर आणि शेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण ४२,२०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत शेड आणि बांधकामे निष्कासित करण्यात आली.
परिमंडळ निहाय केलेल्या कारवाईत परिमंडळ एकमध्ये ९५ हजार चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले, तर परिमंडळ तीन मध्ये बाणेर-बालेवाडी या भागातील ४१ हजार ५०० चौ. फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. परिमंडळ पाचमध्ये ५२ हजार २५० चौ. फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले.
अन्य परिमंडळांमध्ये उद्यापासून कारवाई करण्यात येणार आहे. अनेक अतिक्रमणांना नोटिसा देण्याचे बाकी असून, त्या दिल्यानंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
अनधिकृत जाहिरात फलक तोडले Elimination of encroachments:
महापालिकेने फ्रंट आणि साइड मार्जिनशिवाय अनधिकृत जाहिरात फलकांवर देखील (होर्डिंग्ज) कारवाईला सुरुवात केली. वानवडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३ अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकले. आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त संदीप कदम आणि सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.





