पुणे जिल्हा | मुळशी धरण परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आंदोलनाचा इशारा

पौड (वार्ताहर) – पौड दि.६(वार्ताहर) – मुळशी धरण भागातील विविध समस्या टाटांकडून मंगळवार, दि. ३ ते शुक्रवार, दि. १३ सप्टेंबरपर्यंत सोडवण्यात याव्यात, नाही तर दि. १४ सप्टेंबरपासून मुळशी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या सेनापती बापट स्मारक येथे धरण भागातील ग्रामस्थांसमवेत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडलकुंडवार यांना दिलेले आहे.
या निवेदनामध्ये मुळशी ते वाघवाडी या जलप्रवासासाठी नवीन लाँच घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजनमधून तातडीने एक कोटी चाळीस लाख रूपये मंजूर केले आहेत. येथे लाँचऐवजी कोकणच्या धर्तीवर जेट्टीची सुविधा झाल्यास या भागातील नागरिकांची दळणवळणाची सोय होईल.
त्याचप्रमाणे पर्यटकांची संख्या वाढून येथील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे टाटानेही उर्वरित लागणारा निधी सीएसआरमधून प्राधान्याने द्यावेत,
मुळशी धरण भागातील गावठाण विस्तार अत्यावश्यक असणारी मोजणी करून हद्द कायम करून मिळावे, धरणक्षेत्रातील गावांना सार्वजनिक मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी टाटाने ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे किंवा ही गावे विकासासाठी दत्तक घ्यावीत.
स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते याबाबत जागा देण्यासाठी टाटाने सहकार्य करावे,मुळशी धरणग्रस्तांना पुनर्वसनाचे दाखले सरकारने द्यावेत, मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या टप्पा क्रमांक एक व दोनला गती द्यावी या व याशिवाय विविध मागण्या टाटांकडे करण्यात आलेल्या आहेत.
या मागण्या मुळशी धरण भागातील नागरिक वर्षानुवर्षे करत असून शासन स्तर व टाटा पावर मुळशी यांनी तातडीने समिती नेमावी व मुळशी धरणग्रस्त व मुळशीकरांना न्याय द्यावा, अशी मागणी अमित कंधारे यांनी केली आहे.





