पुणे जिल्हा | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक देशात सर्वोच्च स्थानावर

पौड, (वार्ताहर) – शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार या सर्वांसाठी पुणे जिल्हा बँक काम करीत आहे. याचा उपयोग समाजातील सर्व घटकांसाठी होत आहे. जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शी व स्वच्छ आहे. बँकेला मिळालेला शेड्युल्ड दर्जा त्याचे प्रतिक आहे. उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्वाखाली पुणे जिल्हा बँक देशात सर्वोच्च स्थानावर पोहचली आहे, असे प्रतिपादन वसंतदादा पाटील संस्थेचे सचिव युवराज शहा यांनी केले.
पौड (ता. मुळशी) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशीतील सोसायटी सभासद शेतक-यांच्या मुलांना वह्या वाटप व गुणगौरव समारंभ बँकेच्या वतीने आयोजित करण्यक्त आला होता. त्यावेळी शहा बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे होते.
यावेळी एक हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बँक विद्यार्थ्यांसाठी देशात व देशाबाहेर केवळ 6 टक्के दराने चाळीस लाखांपर्यंत कर्ज देत आहे. देशात एक नंबरचा दर्जा मिळवुन बँक आता जागतिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मुळशीतील शेतकरी सक्षम व्हावा यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहोत. लाडकी बहीण योजनेचा फायदा महिलांना लवकर मिळावा यासाठी बँकेने शून्य शिल्लक खाते सुरू केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन अमराळे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष नीता नागरे, युवक तालुकाध्यक्ष सुशील हगवणे, चेअरमन माऊली माझिरे, माऊली कांबळे, रासपचे तालुका अध्यक्ष भाऊ आखाडे, बँकेचे वसुली अधिकारी राजेंद्र मारणे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले. बँकेचे विभागीय अधिकारी सुरेश नागरे यांनी आभार मानले.





