पुणे जिल्हा | मुळशी धरणातून मुळा नदीत १५,२६५ क्युसेकने विसर्ग

पौड, (वार्ताहर)- दमदार पावसामूळे मुळशी धरण ९६ टक्के भरले असून मुळशी धरणातून मुळा नदीत १५,२६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी धरण लवकर भरले आहे.
धरणाची एकूण क्षमता २१.५ टीमसी असून आसपासच्या परिसरातील सर्वात मोठे आहे. २५ जुलैपासून जोरदार पडत असलेल्या पावसाने यंदा विक्रम केला आहे.
एका दिवसात ५००-६०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याचा हा विक्रम होता. गेल्या आठवड्यात मुळशी धरणातून एक थेंबही पाणी न सोडता मुळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. मात्र पाऊस ओसरताच हे पाणी कमी झाले व नंतर काही कालावधीने टप्प्याटप्प्याने मुळशी धरणातून पाणी सोडले गेले होते.
मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्या कारणाने ( दि. २ ऑगस्ट) रोजी दुपारी १२ वाजता मुळा नदीपात्रात १० हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
याआधी तो ७ हजार ७५० ने करण्यात होता. सकाळी ११ वाजता धरण जलाशय पातळी ६०६.६० मीटर असून धरणातील जलाशय साठा ५४७. ०१४ दलघमी असा होता तर सायंकाळी चार नंतर हा विसर्ग १५२६५ क्युसेक इतका करण्यात आला होता.





