पुणे जिल्हा | आरटीई प्रवेशासाठी पालकांची वणवण

पौड, (वार्ताहर) – बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार आरटीई आरक्षण प्रक्रियेसाठी मुळशी तालुक्यात पालकांची वणवण होताना दिसत आहे.
आपल्या बालकांचा आरटीई प्रवेश निश्चित झाला का नाही हे पाहण्यासाठी पालक मुळशी पंचायत समितीच्या पौड या ठिकाणी सतत चकरा मारत आहेत. तसेच आपल्या बालकाचा यात प्रवेश निश्चित व्हावा यासाठी अनेक क्लृप्त्या लढवताना दिसून येत आहे.
मुळशी तालुक्यात आरटीई अंतर्गत 2024-2025 साठी 38 शाळांमधून आरक्षण प्रक्रिया वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त यादी नुसार 778 बालकांची प्रथम फेरीमध्ये निवड झालेली होती.
यामध्ये 570 बालकांचे प्रवेश निश्चित झालेले असून 208 जण प्रलंबित यादीत पुढे आलेले आहेत. तर पडताळणीत 96 जणांचे प्रवेश रद्द करण्यात आलेले असून 112 बालकांचे पालक प्रवेश प्रक्रियेसाठी आलेच नसल्याची माहिती मिळाली आहे.
आपल्या बालकाचा आरटीईत प्रवेश मिळावा म्हणून अनेक पालक पंचायत समितीच्या परिसरात सतत फिरत असतात.तसेच कोणाचा दबाव टाकून आपले काम होईल का याचाही प्रयत्न पालकांकडून होत आहे.
मुळशी तालुक्यातील भुगाव येथे असलेल्या श्री श्री रविशंकर या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चढाओढ झाली असल्याचे पाहायला मिळाले.
मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी सुजाता देशमाने व शिक्षणचे विस्ताराधिकारी अशोक गोडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
आरटीआयचे अस्त्र उपसले
आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशासंदर्भात प्रवेश न मिळालेल्या बालकांच्या पालकांनी थेट माहितीचा अधिकारचेच अस्त्र उपासलेले आहे. तर बावधन, हिंजवडी, माण, मारूंजी, म्हाळूंगे परिसरातीलही शाळात प्रवेशासाठी मोठी चढाओढ लागलेली पाहायला मिळाली.
अनेकांकडून खोटे भाडेकरार?
अनेक जणांकडून खोटे भाडेकरार करण्यात आलेले असून अशांचेच नंबर आरटीई प्रवेश यादीत आले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
तर केलेल्या भाडेकराराच्या ठिकाणी संबंधित व्यक्ती राहाते की नाही याची तपासणी करण्यासाठी मुळशी गट शिक्षणाधिकारी यांनी वीस पथकांची पडताळणी समिती नियुक्त केली होती.
तसेच जिल्हा परिषद पुणे आणि गटविकास अधिकारी मुळशी यांच्याकडेही याच स्वरूपाच्या अनेक तक्रारी आल्याने त्यांनीही वेगळी पथक भाडेकरार केलेल्या ठिकाणी राहतात की नाही हे पाहण्यासाठी पाठविलेली आहे.
प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असून कोणत्याही पालकांनी कुठल्याही एजंटाच्या प्रलोभनाला बळी पडू नये. – सुजाता देशमाने, गट शिक्षणाधिकारी




