Palasdev News: जलजीवन मिशन योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार? काम अपूर्ण असताना २ कोटी २८ लाखांचे बिल अदा
Palasdev News: पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आणि खर्चाचा फुगवटा; केवळ पाइपलाइनचे काम करून ठेकेदाराने उचलला कोट्यवधींचा निधी.

Palasdev News – इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव असणाऱ्या पळसदेव गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ४ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. योजनेचे काम सुरू झाले असले, तरी यात मोठ्या प्रमाणावर निधीचा गैरव्यवहार आणि गंभीर अनियमितता झाल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारचे २ कोटी ४१ लाख व राज्य सरकारचे २ कोटी ४१ लाख, असा निधी मंजूर आहे.
यामध्ये पाण्याचा स्रोत (४४.५२ लाख), पंप हाऊस (२.६४ लाख), दाब नलिका (१.८१ कोटी), पाण्याची टाकी (३७.८७ लाख), वितरण व्यवस्था (१.८७ कोटी), वीज जोडणी (४ लाख) आणि पम्पिंग मशिनरी (५.७५ लाख), अशी तरतूद आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि ग्रामसेवक तुकाराम शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, या योजनेचे केवळ पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. तरीही ठेकेदाराला तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष काम झाले नसताना हे बिल कसे दिले गेले? ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे बिल उचलल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शासकीय ऑनलाईन पोर्टलवर मारुती नामदेव बनसुडे, अशोक नीलकंठ काळे आणि भीमराव जगन्नाथ बारवकर या तीन नागरिकांना नळ कनेक्शन दिल्याची माहिती अपलोड करून योजना पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, ‘दैनिक प्रभात’ने “कोट्यवधींचा निधी मिळवूनही पळसदेवचा पाणीप्रश्न लटकला” असे वृत्त २७ जुलै रोजी प्रकाशित करताच, प्रशासनाने घाईघाईने पोर्टलवरील स्टेटस बदलून योजना ‘अपूर्ण’ दाखवली.
बनावट लाभार्थ्यांचे वास्तव
पोर्टलवर नाव असलेल्या अशोक काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याला याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. “आमच्या घरापर्यंत अजून वितरण वाहिनी आलीच नाही, मग कनेक्शन कसले मिळाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर दुसरे लाभार्थी भीमराव बारवकर हे पळसदेव गावात राहत नसून शिंदेवस्ती येथे वास्तव्यास आहेत.
खर्च वाढवण्यासाठी पाइपलाइनचे अंतर वाढवले?
योजनेत पाण्याचा स्रोतासाठी ४४.५२ लाख रुपयांची तरतूद आहे. प्रत्यक्षात उजनी संपादित क्षेत्रातील नदीपात्रात सुमारे १.७० किमी आत जॅकवेल बांधण्यात येणार आहे. पाण्याच्या टाकीपासून हे अंतर तब्बल २.३० किमी आहे. जाणीवपूर्वक पाइपलाइनचे अंतर वाढवून खर्च फुगवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. शिवाय, उजनीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत शासकीय अहवालातून प्रश्न निर्माण झाले असल्याने, या जॅकवेलद्वारे गावाला वर्षभर शुद्ध पाणी मिळेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
“पळसदेव जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नदीपात्रात जॅकवेल, मुख्य पाइपलाइन आणि गावात सुमारे ८ ते ९ किमी अंतराची वितरण वाहिनी टाकण्यात आली आहे. आता केवळ पाण्याच्या टाकीचे काम बाकी आहे.”
– नवनाथ वलेकर, पाणीपुरवठा अधिकारी, पंचायत समिती इंदापूर.






