Shikrapur News : एका प्रशासकांकडे आठ गावांचा भार; शिरुर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त
Shikrapur News : एका एका प्रशासकाकडे लांब लांबच्या सात ते आठ गावांचा पदभार दिला आहे. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला आहे.

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ७१ ग्रामपंचायतींवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशासक नेमणुकीचे आदेश जारी केले आहेत. यावेळी ग्रामपंचायतवर नेमलेल्या प्रशासकांमध्ये पंचायत समिती विस्ताराधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा समावेश करण्यात आला आहे. एका एका प्रशासकाकडे लांब लांबच्या सात ते आठ गावांचा पदभार दिला आहे. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला आहे.
शिरुर तालुक्यातील मुदत संपलेल्या ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले असताना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी प्रशासक नेमणुकीचे आदेश काढले आहेत. त्यांचा कार्यकाळ पुढील सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत असे असताना या प्रशासकांमध्ये पंचायत समिती विस्ताराधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिकांचा समावेश केला. मात्र, यामध्ये एका एका प्रशासकाकडे त्यांच्या प्रशासकीय कामांसह शिरुर तालुक्यातील लांब लांबच्या अनेक गावांच्या ग्रामपंचायतचा पदभार दिल्याने गावातील कामांना किती चालना मिळणार यावर तर्क- वितर्क सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंचांचीच प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. मात्र, आता पुन्हा मुदत संपल्यामुळे नव्याने पंचायत समिती विस्ताराधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिकांना प्रशासक म्हणून नेमले आहे. मात्र, काही प्रशासक पदाधिकारी यांच्याकडे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील एक एक गाव दिल्याने आता त्यांना प्रत्येक गावाला पुरेसा वेळ देणे अशक्य नाही. मात्र, त्यामुळे आता ग्रापंचायतचे स्थानिक विकास काम तसेच विविध योजनांची मंजुरी यांना काहीसा ब्रेक लागणार आहे. प्रशासकीय अधिकारी प्रशासक असल्याने त्यांना काही कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही, हे निश्चित असले तरी आता नवीन प्रशासक नेमणुकीमुळे गावच्या विकासात काय भर पडणार याबाबत शंका उपस्थित होत आहे.
प्रशासक व नेमणुकीची गावे.
विस्ताराधिकारी किसन खोडदे- धामारी, पाबळ, मुखई, हिवरे, गणेगाव खालसा, पिंपळे खालसा.
अंगणवाडी पर्यवेक्षिका गायत्री धावडे- आपटी व वाघाळे.
विस्ताराधिकारी मुकुंद देंडगे- करंदी, केंदूर, निमगाव म्हाळुंगी, वाडा पुनर्वसन व वरुडे.
विस्ताराधिकारी रघुनाथ पवार- आलेगाव पागा, उरळगाव, टाकळी भीमा, दहिवडी, पारोडी व इनामगाव.
अंगणवाडी पर्यवेक्षिका राणी कांबळे- गणेगाव दुमाला व नागरगाव.
अंगणवाडी पर्यवेक्षिका रंजना सोनवणे- सादलगाव.
विस्ताराधिकारी बाळू गावडे- कवठे येमाई, कारेगाव, कोंढापुरी, मलठण, मिडगुलवाडी, कान्हुर मेसाई, सविंदणे, आमदाबाद.
विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड- कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, पिंपळे जगताप, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, वढू बुद्रुक, विठ्ठलवाडी.
विस्ताराधिकारी विष्णू गाडीलकर- आंधळगाव, न्हावरे, शिक्रापूर, गुनाट, निमोणे, वाडगाव रासाई, शिरसगाव काटा.
विस्ताराधिकारी संतोष सोनटक्के- बुरुंजवाडी, कोळगाव डोळस, गोलेगाव व खंडाळे.
विस्ताराधिकारी संभाजी घोडे- चांडोह, निमगाव दुडे, पिंपरखेड, फाकटे, वडनेर खुर्द व रावडेवाडी.
अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना वायाळ- चिंचणी व बाभूळसर बुद्रुक.
अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदा पाटोळे- पिंपळसुटी.
अंगणवाडी पर्यवेक्षिका अपर्णा ऊनकुले- मोटेवाडी व शिंदोडी.
विस्ताराधिकारी पूनम मराठे- भांबर्डे, मोराची चिंचोली, निमगाव भोगी, पिंपरी दुमाला व बाभूळसर खुर्द.
विस्ताराधिकारी स्नेहल माकर- जातेगाव बुद्रुक, दरेकरवाडी, जातेगाव खुर्द, कुरुळी व निर्वी.
अंगणवाडी पर्यवेक्षिका पल्लवी देशमुख- खैरेनगर व खैरेवाडी.





