प्रभात वृत्तसेवा दौंड – दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी भरण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवसांपर्यंत भारतीय जनता पक्ष, नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडी, रिपाइं, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट),राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. यामुळे इच्छुक उमेदवार उमेदवारी कधी जाहीर होणार? याकडे डोळे लावून बसले आहेत. दौंड शहरात भाजपा आणि नागरिक हित संरक्षण मंडळ हे एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यानुसार आमदार अॅड. राहुल कुल व जेष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणत्याही उमेदवारास त्यांनी उमेदवारी जाहीर केली नाही. त्यांची चाचपणी सुरू असली तरी बंडखोरी टाळण्यासाठी हा वेळ घेतला असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून ही प्रभाग निहाय उमेदवारांची चाचपणी विरधवल जगदाळे हे करीत आहेत. त्यांनी ही आतापर्यंत एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यांच्या बैठकाही जोर धरत आहेत. तसेच या निवडणुकीत अन्य कोणत्या पक्षाशी युती होईल का? याचीही चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीने दौंड नगरपालिका सर्व जागा लढविणार, असे जाहीर केले असले तरी त्यांनीही आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महाविकास आघाडीत फूट पडण्याची चिन्हे असून त्यातून वेगळीच युती व आघाडी होण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नुसताच खल सुरू नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर सर्वच पक्षांमध्ये खल सुरु आहे. नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला राखीव आहे. या पदावर मराठा कुणबी उमेदवार उमेदवारी मागत आहेत. ते भारतीय जनता पार्टी व नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून उमेदवारी मागत आहेत. त्यामुळे दोन्हीही गटांच्या पुढे कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत पेच उभा आहे. महाविकास आघाडीने याबाबत गुप्तता ठेवल्याने त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत नुसतीच चर्चा सुरू आहे. सामाजिक संतुलन साधावे लागणार.. शहरातील मुस्लिम, मागासवर्गीय आणि ख्रिश्चन समाजाचे मतदारसंघ निर्णायक असल्याने उमेदवारी ठरवताना समाजिक संतूलन साधण्याचे गणित पक्षांना मांडावे लागणार आहे. आगामी काळात ‘फोडाफोडीचे’ राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता असून, शेवटी कोण बाजी मारते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एकंदरीतच दौंड नगरपालिका निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.