Wai Panchgani Road: वाई-पाचगणी रस्त्याचं कोट्यवधींचं काम महिनाभरातच ‘भेगाळलं’; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
Wai Panchgani Road: काँक्रीटचे थर उखडले आणि अवघ्या एका महिन्यात रस्त्याला पडल्या भेगा; वाई-पाचगणी मार्गावरील सार्वजनिक निधीच्या गैरवापराबद्दल तीव्र संताप.

Wai Panchgani Road – वाई-पाचगणी मार्गावरील कोट्यवधी रुपये खर्चाच्या रस्ते विकासकामातील कथित निकृष्ट दर्जा आणि नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ धूळ, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका सहन केल्यानंतर दर्जेदार रस्ता मिळेल, अशी अपेक्षा असताना अवघ्या महिनाभरातच नव्याने झालेल्या काँक्रीट रस्त्यावर भेगा पडू लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची उंची वाढवून काँक्रीटीकरण करण्यात आले मात्र, पावसाच्या पाण्याच्या निचर्यासाठी आवश्यक असलेली गटार व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यालगतची घरे, अंगणे आणि जनावरांचे गोठे सखल भागात गेल्याने मुसळधार पावसात पाणी थेट घरात व गोठ्यांमध्ये शिरत आहे. यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून जनावरांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी काँक्रीटचे थर उखडणे, टवके उडणे आणि रस्त्यावर भेगा पडणे सुरू झाल्याने कोट्यवधींच्या सार्वजनिक निधीचा वापर योग्य पद्धतीने झाला नसल्याची नागरीकांची भावना आहे. काम पूर्ण होण्यापूर्वी संबंधित विभागाने दर्जा तपासणी केली होती का? अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का? तसेच कामात त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कोणती कारवाई केली जाणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पावसाळ्यात घरांमध्ये साचणारे पाणी, वाढलेला आजारांचा धोका आणि नव्या रस्त्याची उघड झालेली निकृष्ट अवस्था यामुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. संबंधित विभागाने तातडीने गटार बांधून रस्त्याचे दोष दूर करावेत, कामात हलगर्जीपणा करणार्या जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अवघ्या एका महिन्यात भेगा पडणारा रस्ता पुढील किती वर्षे टिकणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास लोकआंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.





