Monsoon Care: पावसाळ्यात केस का गळतात? ‘ही’ कारणं जाणून घ्या आणि वेळेत उपाय करा
Monsoon Care पावसाळ्यात घाम, धूळ आणि प्रदूषणामुळे टाळूवर घाण साचते. त्यामुळे केस आणि टाळू नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. मात्र, खूप गरम पाण्याने केस धुणे टाळावे.

Monsoon Care: पावसाळा सुरू झाला की अनेकांना केसगळतीची समस्या जाणवू लागते. केस धुतल्यानंतर, विंचरताना किंवा उशीवरही नेहमीपेक्षा जास्त केस दिसू लागतात. त्यामुळे अनेकजण चिंतेत पडतात. मात्र, पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे ही सामान्य गोष्ट मानली जाते. हवेत वाढलेला ओलावा, पावसाचे पाणी आणि टाळूवरील संसर्ग यामुळे केस कमकुवत होऊन गळू शकतात. योग्य काळजी घेतल्यास ही समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात ठेवता येते.
पावसाळ्यात केस जास्त का गळतात? (Monsoon Care)
१. हवेत वाढलेला ओलावा (Humidity)
पावसाळ्यात हवेत आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. केस हवेतला अतिरिक्त ओलावा शोषून घेतात. विशेषतः केस आधीच ओले असतील तर त्यांच्यामध्ये अधिक पाणी साचते. त्यामुळे केसांच्या आतील प्रथिनांचे बंध कमकुवत होतात आणि केस सहज तुटू किंवा गळू लागतात.
२. पावसाचे पाणीही ठरू शकते कारण
पावसाचे पाणी स्वच्छ असते, असा अनेकांचा समज असतो. मात्र, शहरांमध्ये पावसाच्या पाण्यात धूळ, प्रदूषण, रसायने आणि इतर हानिकारक घटक मिसळलेले असू शकतात. हे पाणी केसांवर वारंवार पडल्यास केस कोरडे, निस्तेज आणि कमकुवत होऊ शकतात.
३. टाळूवर वाढणारी घाण आणि संसर्ग
पावसाळ्यात टाळू बराच वेळ ओलसर राहते. त्यामुळे टाळूवर घाण साचणे, कोंडा होणे, बुरशीजन्य संसर्ग किंवा इतर त्वचेच्या समस्या वाढू शकतात. या कारणांमुळेही केसगळती वाढते.

Monsoon Hair Fall
पावसाळ्यात केस गळणे सामान्य आहे का? (Monsoon Care)
तज्ज्ञांच्या मते, दिवसाला 50 ते 100 केस गळणे सामान्य मानले जाते. मात्र, पावसाळ्यात ही संख्या 100 ते 200 पर्यंत जाऊ शकते. हा हंगामी बदल असल्यामुळे फार काळजी करण्याची गरज नसते. पण जर दररोज 200 पेक्षा जास्त केस गळत असतील किंवा केस खूपच पातळ होत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात केसगळती कशी कमी कराल? (Monsoon Care)
केस पावसात भिजू देऊ नका
शक्यतो पावसात बाहेर पडताना छत्री, रेनकोट किंवा कॅपचा वापर करा. केस भिजण्यापूर्वी लीव्ह-इन कंडिशनर लावल्यास केसांवर संरक्षणाचा थर तयार होतो आणि अतिरिक्त ओलाव्याचा परिणाम कमी होतो.
केस भिजल्यास लगेच वाळवा
जर केस पावसात भिजले असतील, तर ते बराच वेळ तसेच ओले ठेवू नका. शक्य तितक्या लवकर मऊ टॉवेलने पुसून वाळवा. आवश्यक असल्यास कमी उष्णतेवर हेअर ड्रायरचा वापर करू शकता. त्यामुळे टाळू ओलसर राहत नाही आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
पौष्टिक आहार घ्या
केस निरोगी ठेवण्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळणे गरजेचे आहे. आहारात बायोटीन, लोह, झिंक, व्हिटॅमिन A, C आणि E यांचा समावेश असलेले पदार्थ खा. हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, बिया, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थ केसांना आतून मजबूत बनवतात.
योग्य हेअर प्रॉडक्ट्स वापरा
जर कोंडा किंवा टाळूवर खाज येत असेल, तर अँटी-डँड्रफ किंवा अँटी-फंगल शॅम्पू वापरू शकता. तसेच केसांच्या प्रकारानुसार योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडणेही महत्त्वाचे आहे.
केसांची नियमित स्वच्छता ठेवा (Monsoon Care)
पावसाळ्यात घाम, धूळ आणि प्रदूषणामुळे टाळूवर घाण साचते. त्यामुळे केस आणि टाळू नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. मात्र, खूप गरम पाण्याने केस धुणे टाळावे.
पावसाळ्यात केसगळती ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या असली, तरी योग्य काळजी, संतुलित आहार आणि योग्य हेअर केअर रूटीन पाळल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते. केस जास्त प्रमाणात गळत असतील किंवा इतर त्रास जाणवत असेल, तर स्वतः उपचार करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.





