Wadgaon Mawal: भाजपचा नगरपंचायतीला ‘७ दिवसांचा’ अल्टिमेटम; वडगाव मावळात गुरुवारी काय घडणार?
Wadgaon Mawal: वडगाव मावळमध्ये आठवडे बाजारामुळे दर गुरुवारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी; शहर भाजपचे मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन.

Wadgaon Mawal – वडगाव मावळ शहरात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक, व्यापारी आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव -कातवी शहराच्या भाजपाच्या वतीने वडगाव-कातवी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, पुढील सात दिवसांत वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वडगाव शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, गटनेते दिनेश ढोरे, ॲड. मृणाल म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष अतिश ढोरे, नगरसेवक संदीप म्हाळसकर, अनंता कुडे, विशाल वहिले, नगरसेविका राणी म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सरपंच नितीन कुडे, युवा चिटणीस विकी म्हाळसकर, युवा मोर्चा पदाधिकारी शंकर चव्हाण आदी उपस्थित होते. निवेदनानुसार, वडगाव मावळ हे तालुक्याचे मुख्य महसुली केंद्र असल्याने येथे दर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते.
आठवडे बाजारामुळे आजूबाजूच्या गावांमधून तसेच शहरातून महिला, वृद्ध, विद्यार्थी, लहान मुले आणि व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात येतात. याच मुख्य बाजारपेठ रस्त्यावरून जिल्हा व सत्र न्यायालय, तहसील कचेरी, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समिती आणि वडगाव रेल्वे स्टेशन येथे जाणाऱ्या नागरिकांचीही ये-जा सुरू असते.
बाजारपेठ परिसरात गुरुवारी चारचाकी वाहनांना मुक्त प्रवेश दिला जात असल्याने मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून वाहनचालकांमध्ये सतत वादविवाद होत आहेत. वाहनांच्या अनिर्बंध गर्दीमुळे अपघातांची शक्यताही निर्माण झाली आहे. भाजप महिला आघाडीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, दर गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारपेठ परिसरात पोलीस यंत्रणेमार्फत योग्य ठिकाणी बॅरिकेट्स लावून चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात यावी.
तसेच वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा. पुढील सात दिवसांच्या आत गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराचे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्यास, आठवडे बाजाराच्या दिवशी नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.






