प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांहून अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग ताशी १९.५ किमी इतका होता. सध्या हा वेग २२.५ किमी इतका झाला असून, यामध्ये १०.४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. भविष्यात शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग ताशी ३० किमीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट शहर पोलिसांनी ठेवले आहे. वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विविध उपाययोजना, रस्त्यांवरील अडथळे कमी करणे तसेच शहरातील मेट्रो सेवेच्या विस्तारामुळे वाहतुकीच्या वेगात सकारात्मक बदल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व उपाययोजना अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आल्या. शहरातील वाहतुकीचा दररोज आणि प्रत्येक मिनिटाचा आढावा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतला जात असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. यासाठी महापालिकेची एटीएमएस प्रणाली, तसेच गूगल मॅप, मॅपल्स आणि मॅप माय इंडिया या प्रणालींचा वापर केला जातो. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवरील वाहतुकीचा वेग, कोंडी आणि प्रवाह याचे सतत विश्लेषण करण्यात येते. रस्ता रुंदीकरणाद्वारे वहन क्षमतेत वाढ, रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा, सिग्नल सिंक्रोनायझेशन, राँग साइड आणि ट्रिपल सीट वाहनचालकांवर कडक कारवाई, बॉटल नेक ठिकाणी सुधारणा, शहरातील मिसिंग लिंक जोडणे, वाहतुकीचे अडथळे हटवणे, चौक व जंक्शन सुधारणा आदी योजना वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी प्रभावी ठरल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.