Talegaon Dabhade – स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, हरित तळेगाव, प्रदूषणमुक्त तळेगाव अशा घोषणा देत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू असताना वास्तव मात्र याच्या पूर्णपणे विरुद्ध दिसत आहे. शहरातील प्रमुख मार्गांचे रुंदीकरण करूनही पार्किंग व्यवस्थेचा पूर्ण अभाव असल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला असून नागरिकांना दररोज कोंडीचा सामना करावा लागत आहे. तळेगावात प्रवेश करताच लिंब फाटा, मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, मामासाहेब खांडगे चौक, समर्थ हॉस्पिटल परिसर, स्टेशन चौक ते एसटी स्टँडपर्यंतचा मुख्य मार्ग हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या संपूर्ण मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असले, तरी वाहतूक सुरळीत करण्याचा मूळ उद्देशच हरवला असल्याचे चित्र आहे. वाहनधारकांना अधिकृत पार्किंगची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे गाडी लावली जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनियोजित पार्किंग होत असून, वाहतुकीसाठी उपलब्ध जागा पुन्हा अरुंद होत आहे. लिंब फाटा ते भंडारी हॉस्पिटल दरम्यान, मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, खांडगे पेट्रोल पंप, नगरपरिषदेच्या इमारतीसमोर, समर्थ हॉस्पिटल परिसर, तसेच स्टेशन चौक ते एसटी स्टँड या संपूर्ण पट्ट्यात हीच परिस्थिती पाहायला मिळते. वाहतूक कोंडी ही परिसरातील नेहमीची बाब झाली असून, गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या पार्श्वभूमीवर शहरात तातडीने नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उभारणे, रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकूणच तळेगावातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा अभाव हा गंभीर नागरी प्रश्न बनला असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.