पुणे | अतिक्रमणे काढा, सिग्नलची वेळ कमी करा

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – येत्या काळात पुणे हे वाहतूक कोंडीमुक्त शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. आवश्यकतेनुसार एकेरी वाहतूक व्यवस्था सुरु करणे, रस्त्याकडेची अतिक्रमणे काढणे, सिग्नलची वेळ कमी करणे, सिग्नलविरहित वाहतूक व्यवस्थापन, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, मिसिंग लिंक्स जोडणे आदी उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येचा पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात सर्वंकष आढावा घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते. तर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
पवार म्हणाले, पुणे शहर आणि परिसरातील औद्योगिक विकासामुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधींमुळे राज्याच्या विविध भागांतून पुणे शहरात नागरिक येत असतात. त्यामुळे नागरीकरण झपाट्याने झाले आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून मागील काही वर्षांत पुणे शहराची दुपटीने वाढ झाली आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर कमालीचा ताण येऊन वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून कोणत्याही परिस्थितीत सुटका झाली पाहिजे. त्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या सूचना
– पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या उपाययोजनांचा प्रस्ताव पाठवावा.
– महापालिकेने नवले जंक्शन येथील अतिक्रमण हटवावे
– कारवाईवेळी पोलीस आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा.
– नवले ब्रिज, कोरेगाव पार्क, अप्पा बळवंत चौक आदी ठिकाणची वाहतूक कोंडी प्राधान्याने सोडवावी
– वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.
– सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
– वाहतूकविषयक तज्ज्ञ प्रतिनिधींचा समावेश असणारी समन्वय समिती स्थापन करावी.





