पुणे – वीज मीटर बसवण्याची हमी देत रिक्षाचालकाची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणूकीसह इतर कलमांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एन.ओंडरे यांनी हा आदेश दिला आहे. रज्जाक इसाक सय्यद यांनी ऍड. अफरोज एच. शेख यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती.
यावर सुनावणी करत नितीन रमेश नाईक याच्यावर गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश कोंढवा पोलिसांना देण्यात आले आहेत. सय्यद यांना इमारतीमध्ये वीज मीटर बसवायचा होता. इलेक्ट्रीशियनमार्फत फिर्यादी आणि नाईक याची ओळख झाली. मी महावितरणचे ठेका घेतो.
अधिकारातून 15 दिवसात मीटर बसवुन देण्याचे अमिष नाईक याने दाखविले. त्यानुसार फिर्यादीने 1 मार्च 2022 रोजी 46 हजार रुपये दिले. मात्र, मीटर बसविण्यात आला नाही. पैसेही परत दिले नाहीत. त्यानंतर “तुमचे काम होणार नाही, पैसेही परत देणार नाही’ असे फिर्यादींना सांगण्यात आले.
अधिक चौकशी केली असता, त्याचा आणि महावितरणाचा कोणताही संबंध नसल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यामुळे ऍड. अफरोज एच. शेख यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती.