विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती? पुन्हा एकदा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रश्न

– विवेकानंद काटमोरे
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं आपलीच माती
तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ?
बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं
उभ्या उभ्या संपून जाई
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं
कुंपण इथं शेत खाई
भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती
तरी झेंडे येगळे.. येगळ्या जाती
विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ?
हडपसर – झेंडा चित्रपटातील हे गाणं सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीत शिवसेनेला तंतोतंत लागू होत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. शिवसेनेचे हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंडाचा झेंडा हाती घेवून थेट राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. खासदार, आमदार,नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे आणि शिंदे गटात विभागले गेले.
त्यांनतर शिवसेना पक्ष ,धनुष्यबाण चिन्ह आणि सत्ता संघर्ष निवडणूक आयोग आणि न्यायालयात गेला. घडणाऱ्या या सर्व परिस्थितीकडे काहींनी संधी, पक्षनिष्ठा म्हणून निर्णय घेतले. तर, काहींनी ‘वेट अँण्ड वॉच’ ची भूमिका घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर पुन्हा एकदा हडपसर मतदार संघातील अनेक शिवसैनिक व पदाधिकारी यांची स्थिती कोणता झेंडा घेऊ हाती ? अशी झाली आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे हे शिवसेना पक्ष फुटीच्या आधीपासूनच शिंदेंच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांनी पक्षाची दोन गटात विभागणी होताच शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना पुणे शहरप्रमुख पद देत शिंदे गटाने त्यांचे स्वागत केले.
पुढे जिल्हा प्रमुख म्हणून उल्हास तुपे यांना आणि अन्य काही पदाधिकारी भानगिरे यांनी शिंदे गटात सामील करून घेतले.त्याच वेळी हडपसर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, जिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक विजय देशमुख,तानाजी लोणकर, उपशहर प्रमुख समीर तुपे,माजी नगरसेविका संगीता ठोसर,
प्राची आल्हाट यांनी उद्धव ठाकरेंन सोबत राहणे पसंत केले.यांच्या व्यतिरिक्त अनेक शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी हे शिवसेना नाव आणि चिन्ह कोणाला मिळणार याचे चित्र स्पष्ट होत नाही तो पर्यंत कोणता झेंडा घेवू हाती? हा प्रश्न सर्वांना सतावतच राहिला होता.
परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर आता आपण नेत्यांच्या बाजूने उभे रहावे का पक्षनिष्ठा दाखवावी? असा प्रश्न हडपसर विधानसभामतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे.हडपसर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून महादेव बाबर यांनी विधानसभेत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून एन्ट्री केली.
तर, प्रमोदनाना भानगिरे यांच्यासह, प्राची आल्हाट, संगीता ठोसर हे शिवसेनेचे नगरसेवक म्हणून महापालिकेत गेले.त्यामुळे सेनेची ताकद येथे वाढली होती.एकंदरीच हडपसर मतदार संघातील शिवसेनेची घोडदौड ही स्थानिक नेत्यांच्या चेहर्यापेक्षा पक्ष निष्ठेवर अधिक राहिली होती.
आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे गटाचा दावा मान्य केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हडपसर मतदार संघातील अनेक शिवसैनिक व पदाधिकारी यांची स्थिती कोणता झेंडा घेऊ हाती? अशी झाली आहे.




