जुन्नरचा झेंडा दिल्लीत! विशाल भुजबळ यांची ‘विश्व हिंदू महासंघा’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती
Vishal Bhujbal : पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक विशाल भुजबळ यांची विश्व हिंदू महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ओझर : महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि निस्वार्थ समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे विशाल भुजबळ यांची ‘विश्व हिंदू महासंघ’ (World Hindu Federation – भारतीय शाखा) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील एका तळागाळातून काम करणाऱ्या नेतृत्वाला आता राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळाली आहे. विशाल भुजबळ हे ‘त्रिशक्ती उद्योग समूहा’चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी स्वकर्तृत्वावर मोठे यश संपादन केले आहे, परंतु त्यांची खरी ओळख त्यांच्या सामाजिक कार्यातून निर्माण झाली आहे. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून त्यांनी अनेक गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी आपले आयुष्य वेचले आहे.
सर्वाधिक लक्षवेधी आणि माणुसकीला साजेसे त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी आजवर तब्बल एक हजाराहून अधिक बेवारस मृतदेहांवर स्वखर्चाने आणि पूर्ण सन्मानाने अंत्यसंस्कार केले आहेत. ज्यांना जगात कुणीही वाली नाही, अशांसाठी ते धावून जातात.
याव्यतिरिक्त, स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी ते दरवर्षी १०० गरीब आणि गरजू मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची व्याप्ती आणि निस्वार्थ भावनेमुळे ते संपूर्ण पुणे विभागात आणि महाराष्ट्रात आदराचे स्थान बनले आहेत.
विशाल भुजबळ यांनी याआधी विश्व हिंदू महासंघाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून अत्यंत यशस्वीरीत्या काम पाहिले आहे. राज्यामध्ये संघटनेची पाळेमुळे घट्ट करण्यात आणि हिंदू धर्माची सहिष्णुता व तत्त्वे तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोठे योगदान दिले.
त्यांच्या याच सातत्यपूर्ण कार्याची आणि संघटनेप्रती असलेल्या निष्ठेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी त्यांना महासंघाचे ‘आजीवन सदस्यत्व’ (Life Member) बहाल करण्यात आले होते.
याच पाठोपाठ ९ मार्च २०२६ रोजी विश्व हिंदू महासंघ (भारत) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही. पी. सिंग यांच्या स्वाक्षरीने एका अधिकृत पत्राद्वारे भुजबळ यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही. पी. सिंग यांनी पत्रात नमूद केले आहे की, “आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुमचे नेतृत्व आणि तुमचा अनुभव आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेसाठी एक मोठी जमेची बाजू ठरेल.” या शब्दांत त्यांनी भुजबळ यांचे राष्ट्रीय संघात स्वागत केले आहे.
विशाल भुजबळ यांच्या या राष्ट्रीय निवडीमुळे पुणे शहरात उत्साहाचे वातावरण असून, विविध राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या एका खऱ्या कार्यकर्त्याचा हा सर्वोच्च सन्मान मानला जात आहे.





