Indapur : वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्यांसाठी आवाज उठवणार; कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही
Indapur : यावेळी समाजबांधवांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची माहिती घेतली. वाघ्या-मुरळी समाजाच्या वतीने या महामेळाव्यात विविध मागण्या मांडण्यात आल्या. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या मागण्यांची भरणे यांनी गांभीर्याने दखल घेत समाजाच्या न्याय्य मागण्या शासनदरबारी मांडून त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

इंदापूर : वाघ्या-मुरळी समाजाच्या विविध मागण्या आणि समस्या जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. गोतोंडी येथे वाघ्या-मुरळी परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महामेळाव्यास त्यांनी उपस्थिती लावली.
यावेळी समाजबांधवांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची माहिती घेतली. वाघ्या-मुरळी समाजाच्या वतीने या महामेळाव्यात विविध मागण्या मांडण्यात आल्या. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या मागण्यांची भरणे यांनी गांभीर्याने दखल घेत समाजाच्या न्याय्य मागण्या शासनदरबारी मांडून त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेमध्ये वाघ्या-मुरळी समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र, या समाजातील अनेक बांधवांना आजही विविध सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे, मुलांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, सामाजिक सुरक्षा उपलब्ध व्हावी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे, यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची भूमिका भरणे यांनी व्यक्त केली.
गोतोंडी येथे आयोजित या राज्यस्तरीय महामेळाव्याच्या माध्यमातून वाघ्या-मुरळी समाजाच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळाले. समाजाच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या महामेळाव्यास वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे, परिषदेचे पदाधिकारी, समाजातील ज्येष्ठ मंडळी, कार्यकर्ते आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.





