Pune District : कालव्याचे पाणी शिरल्याने कोथिंबिरीचे नुकसान
Pune District : सध्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. परिसरात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने शेतकरी कालव्याच्या पाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच कालव्यातून वाहत आलेले पाणी खोलगट भागातून जाधव यांच्या शेतात शिरले.

लाखणगाव : काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील गणेशवस्ती परिसरात हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे उजव्या कालव्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतकरी अंकुश जाधव यांच्या काढणीला आलेल्या कोथिंबीर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी कोणीतरी कालव्यातून पाणी सोडल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. परिसरात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने शेतकरी कालव्याच्या पाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच कालव्यातून वाहत आलेले पाणी खोलगट भागातून जाधव यांच्या शेतात शिरले. त्यामुळे काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोथिंबीर पिकात पाणी साचले आहे. परिणामी पिकाच्या नुकसानीची भीती शेतकऱ्याला सतावत आहे.
दरम्यान,कालव्यातून पाणी कोणी सोडले,याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. संबंधित शेतकऱ्याने याबाबत तक्रार केली असून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करून गरजू शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि इतरांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट: शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी कालव्यातून रात्री पाणी सोडण्यात आले. मात्र, ते माझ्या शेतात घुसल्याने काढणीला आलेल्या कोथिंबिरीचे नुकसान झाले आहे. मला नुकसानभरपाई मिळावी आणि जलसंपदा विभागाने पाणीवाटपाचे योग्य नियोजन करावे.
-अंकुश जाधव, कोथिंबीर उत्पादक शेतकरी, काठापूर.





