Alandi : कचरा डेपो धगधगतोय; विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Alandi : कचरा डेपोला संरक्षक भिंत अथवा कुंपण नसल्यामुळे मोकाट जनावरे डेपोतील कचरा खात आहेत. त्यामुळे अनेक जनावरे आजारी पडून मृत्युमुखी पडत असल्याची तक्रारही पुढे आली आहे. कचरा डेपोतील आगी आणि धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.

आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या हनुमानवाडी येथील कचरा डेपोला वारंवार आग लागत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा जळल्यामुळे निर्माण होणार्या धुराचा त्रास केळगावच्या हनुमानवाडी परिसरातील रहिवाशांसह शेजारील ठाकरवाडीतील आदिवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने पुणे जिल्हा भारतीय जनसंसदेचे अध्यक्ष पैलवान बाळासाहेब चौधरी यांनी संताप व्यक्त करत संबंधित प्रशासनाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
कचरा डेपोला संरक्षक भिंत अथवा कुंपण नसल्यामुळे मोकाट जनावरे डेपोतील कचरा खात आहेत. त्यामुळे अनेक जनावरे आजारी पडून मृत्युमुखी पडत असल्याची तक्रारही पुढे आली आहे. कचरा डेपोतील आगी आणि धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. या गंभीर प्रश्नावर तहसीलदार प्रशांत बेडसे आणि उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्याकडे नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कचरा डेपो परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, कचरा जाळण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणावे आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल होत नसल्याने आता संबंधित प्रशासनाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा पैलवान बाळासाहेब चौधरी यांनी दिला आहे. आळंदीतील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न प्रशासन कधी मार्गी लावणार, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.





