Prithviraj Chavan : “पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आचारसंहितेचा भंग”; पृथ्वीराज चव्हाण मागणार उच्च न्यायालयात दाद

Prithviraj Chavan – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ करत आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली. पण मोदींवर कारवाई केलेली नाही. याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगितले.
मुंबईतील टिळक भवन येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर आता काँग्रेस पक्षाचा वतीने वॉच ठेवण्यात आले आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दि. 28 डिसेंबर 2020 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, कृषी मंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या 100 व्या गाडीचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु होत्या.
या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासन यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता सुरुवातीला वेळकाढूपणा करण्यात आला. पण शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज देण्यात आली. या प्रकरणी सरळ सरळ कायदा धाब्यावर बसवण्यात आलेला आहे, हे स्पष्ट दिसत असतानाही नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे ते म्हणाले.
या प्रकरणी तक्रार करणारे प्रफुल्ल कदम यांनी आचारसंहिता भंग कशी झाली याची माहिती सर्व नियम आणि कायद्यानुसार दिली. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न असून आदर्श आचारसंहितेचा उघड भंग केलेला असल्याने नरेंद्र मोदी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.





