Vinod Kambli Advertisement : विनोद कांबळीच्या संघर्षाचे ‘आईस्क्रीम’साठी भांडवल! ‘दिनशॉ’च्या जाहिरातीवर नेटकरी सतापले, पाहा VIDEO
Vinod Kambli Advertisement : विनोद कांबळी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचा वापर करून 'दिनशॉ' या प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँडने तयार केलेली जाहिरात वादात सापडली आहे

Vinod Kambli Dinshaws Advertisement Controversy : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचा वापर करून ‘दिनशॉ’ (Dinshaw’s) या प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँडने तयार केलेली जाहिरात, सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चाहते आणि नेटकरी ब्रँडवर प्रचंड संतापले असून, मार्केटिंगच्या या पद्धतीवर जोरदार टीका होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या आयुष्यातील कठीण काळ आणि चढ-उतारांवर भाष्य करणारी ‘दिनशॉ’ आईस्क्रीमची नवी जाहिरात चर्चेत आली आहे. ‘कमबॅक'(Comeback) असे नाव दिलेल्या या जाहिरातीमध्ये, आईस्क्रीम कोनच्या शेवटच्या भागातील एक्स्ट्रा चॉकलेट टिपची तुलना कांबळी यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि संघर्षाशी करण्यात आली आहे. मात्र, चाहत्यांना ही तुलना अजिबात रुचलेली नाही.
Dinshaw’s new ad for its ice cream cone, featuring Vinod Kambli, by the agency Womb, left me dismayed. The narrative crux is the line “Jinko life mein thoda kam mila, unke liye thoda zyada”.
The subject of that “thoda kam mila” framing is a real, living person whose health… pic.twitter.com/QOV0ph1W7b
— Karthik 🇮🇳 (@beastoftraal) April 23, 2026
चाहत्यांचा संताप आणि असंवेदनशीलतेचा आरोप –
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी ब्रँडला चांगलेच धारेवर धरले आहे. देशासाठी अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या एका महान खेळाडूच्या खालावलेल्या आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीचे भांडवल करून, आईस्क्रीम विकण्यासाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या वाईट काळाचा वापर व्यावसायिक लाभासाठी करणे जाहिरात विश्वात चुकीचे मानले जात आहे.
हेही वाचा – Virat Kohli Argument : अहमदाबादमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! रजत पाटीदारच्या वादग्रस्त विकेटवर विराट कोहली संतापला; फोर्थ अंपायरशी झाली बाचाबाची
दिनशॉ ब्रँडने दिले स्पष्टीकरण –
या वादानंतर जाहिरात मोहिमेचे क्रिएटिव्ह लीड गुंजन गाबा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जाहिरातीला ९५ टक्के लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, विनोद कांबळी यांची जिद्द आणि त्यांच्या आयुष्यातील छोट्या आनंदांना साजरे करणे हाच यामागचा मुख्य हेतू होता, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, ब्रँडच्या या स्पष्टीकरणानंतरही लोकांचा रोष कमी झालेला नाही. जाहिरातीचा हेतू चांगला असला तरी, त्याची मांडणी अतिशय असंवेदनशील असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.





