Devendra Fadnavis : विद्यानंद बापट प्रकरणाची फडणवीसांकडून गंभीर दखल; घेतला हा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची फडणवीसांनी गंभीर दखल घेत पोलिस संरक्षणाचे आदेश दिले. दिशा सालियन सीबीआय तपास आणि गणेशोत्सवावरही भाष्य.

Devendra Fadnavis : गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेची राज्याच्या गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे.
विधानभवनात पत्रकारांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपली भूमिका आणि मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केल्याची माहिती दिली.
‘मताचे उत्तर मारहाण असू शकत नाही’ –
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याबाबत फडणवीस म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीवर अशा पद्धतीने हल्ला किंवा मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. संविधानाने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात अशा प्रकारचे वाद आणि हिंसक घटना घडणे योग्य नाही. सर्वांनी एकमेकांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव पुन्हा पारंपरिक पद्धतीने व्हावा –
गणेशोत्सवाचे स्वरूप पुन्हा पारंपरिक आणि शांततापूर्ण पद्धतीकडे नेण्याची सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पहिल्याच वर्षी शंभर टक्के बदल होईलच असे नाही; मात्र उत्सवाचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे; फडणवीस म्हणाले… –
दिशा सालियन प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्याबाबतही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणाचा सखोल तपास पूर्ण करून अहवाल सादर केला होता. मात्र, उच्च न्यायालयाला काही तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी असल्याचे किंवा तपासाची आणखी एखादी दिशा तपासणे आवश्यक असल्याचे वाटले असावे. त्यामुळे न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला असावा, असे फडणवीस यांनी सांगितले.
पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर –
दरम्यान, २४ तास वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने विधानभवनात मुख्यमंत्री सहायता निधीच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या उपक्रमाचे फडणवीस यांनी कौतुक केले.
पत्रकारांचे काम अनियमित आणि संघर्षाचे असते. रस्त्यावर तासन्तास काम करणाऱ्या कॅमेरामनसाठी व्हेरिकोज व्हेन्सवरील स्टॉकिंग्ज, इमर्जन्सी किट्स तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीची सुविधा शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिरानंतरही गरज भासल्यास शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जाईल. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना वर्षभर वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात स्वतंत्र समर्पित समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
मतभेद असू शकतात, मात्र हिंसेचं समर्थन नाहीच -मुरलीधर मोहोळ
पुण्यात डीजेच्या आवाजाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं असू शकतात. एकमेकांची भूमिका पटत नसेल तर त्याला उत्तर संवादातून आणि वैचारिक भूमिकेतून देता येते. मात्र विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर हात उचलणे, हा कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग नाही.
या प्रकरणात कडक कारवाईसंदर्भात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणेही झाले असून संबंधित व्यक्तीला अटक करत अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बापट यांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देशही दिले आहेत.





