Vanaya Project : ‘मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, हे आसबे बंधूंनी कर्तृत्वाने सिद्ध केलं’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्गार
Vanaya Project : व्यंकटेश बिल्डकॉनच्या 'वनाया' प्रकल्पाचे थाटात भूमिपूजन

पुणे : एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अंकुश आसबे आणि त्यांच्या परिवाराने मोठ्या मेहनतीच्या बळावर व्यावसायिक क्षेत्रात उभे केलेले हे साम्राज्य नक्कीच कौतुकास्पद आहे. मराठी माणूस फक्त नोकरी करू शकतो, व्यवसाय करू शकत नाही हा गैरसमज त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोडून काढल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत.
पुण्यातील खराडी येथे व्यंकटेश बिल्डकॉन कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या ‘व्यंकटेश वनाया’ या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज, शनिवारी मोठ्या उत्साहात उपमुख्यमंत्री शिंदे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार किरण सामंत, आमदार माऊली कटके, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार सुनील टिंगरे, संकेत बावनकुळे, अभिषेक थोरवे, अरुण जिंदाल, कुमार गोसावी, अंकुश आसबे, लहूराज आसबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघासाठी आज मतदान; 25 जागांसाठी एकूण 50 उमेदवार रिंगणात
भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे ‘रिअल इस्टेट’ हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. कोरोना काळात डेव्हलपर्ससमोर अनेक अडचणी आ वासून उभ्या होत्या. अनेक व्यावसायिकांनी आम्हाला मदत केली नाही तर आम्हाला ऑक्सिजन लावण्याची वेळ येईल, अशी आर्त हाक दिली होती.
बांधकाम व्यावसायिकांच्या या अडचणी समजून घेत आम्ही ‘युनिफाइड डीसीपीआर’मध्ये मोठे बदल केले, ज्यामुळे शेवटी सर्वसामान्य ग्राहकाला परवडणारी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि हा व्यवसायही जोमाने वाटचाल करू लागला, अशी आठवण या प्रसंगी शिंदे यांनी सांगितली.
मुंबई-ठाण्याप्रमाणेच आता पुण्यातही एसआरए, म्हाडा व क्लस्टर पुनर्विकासातील अडचणी दूर करण्यासाठी गृहनिर्माण विभाग प्रयत्नशील आहे. पुण्यातील वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, रिंगरोड आणि रस्त्यांचे रुंदीकरण वेगाने केले जात असून भविष्यात या अडचणीतून नागरिकांना नक्की दिलासा देण्यात येईल, असेही या वेळी नमूद केले.
क्वालिटी वर्क आणि ग्राहकांचे समाधान या बळावर व्यंकटेश बिल्डकॉन कंपनीने अत्यंत कमी काळात पुण्यासह मुंबई व इतर भागात आपला विस्तार केला असल्याचे पाहून मला समाधान आहे. जर तुम्ही आपल्या ग्राहकांना समाधान देऊ शकत असाल तर निश्चितच तुम्ही यशाची पायरी चढू शकता याचे उदाहरण म्हणजे आसबे यांचा व्यंकटेश बिल्डकॉन हा ग्रुप म्हणता येईल. या ग्रुपच्या माध्यमातून भविष्यात जे जे प्रकल्प हाती घेतले जातील ते तडीस नेण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे या वेळी शिंदे यांनी सांगितले.
व्यंकटेश बिल्डकॉनचे सीएमडी अंकुश आसबे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्रातील बांधकाम व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याचे सांगून पुण्याच्या नगरविकासात शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास माजी आमदार राजन पाटील, प्रवीण गायकवाड, नगरसेवक सुरेंद्र पठारे, संजय अवताडे यांच्यासह व्यंकटेश बिल्डकॉनचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार लहूराज आसबे यांनी मानले.
भूमिपूजनापूर्वीच २५० घरांचे बुकिंग…
खराडी येथे १० एकर क्षेत्रात साकार होत असलेल्या ‘व्यंकटेश वनाया’ या प्रकल्पात जवळपास १४००हून अधिक टू-थ्री, फोर बीएचकेची घरे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, या ठिकाणी विविध प्रकारच्या २५ ॲमेनिटीची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बुकिंग महोत्सवात २५०हून अधिक घरांचे बुकिंग झाले असल्याची माहिती या वेळी अंकुश आसबे यांनी दिली.
हेही वाचा:





