Rohit Pawar: भाजप सुनेत्रा पवारांना अर्थखाते देणार नाही!
Rohit Pawar:

रोहित पवार यांची भाजपवर टीका
Rohit Pawar: राज्याचे उममुख्यमंत्री दिवंगत अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थखाते चोरून घेतले आणि ते हावरटासारखे स्वतःकडे ठेवले. भाजप हे खाते परत देणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महायुतीच्या एका बैठकीत राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखाते देण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
पवार म्हणाले, सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्री पद मिळणार नाही, भाजपला मी फार ओळखतो. त्यामुळे मी भाजपपासून लांब आहे. अजित दादांना त्यांच्या पक्षातील आणि भाजपमधील दोघेही न्याय देऊ शकले नाहीत.
तसेच, सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत न केल्यास पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यभर तीव्र आंदोलने छेडली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने दिलेली पाच हजारांची मदत अपुरी असून याद्वारे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गृहीत धरले जात आहे. गरीब जनता आणि शेतकरी या सरकारला त्यांची नक्कीच जागा दाखवतील, असा इशारा रोहित पवारांनी यावेळी दिला.
कडक कारवाई झाली पाहिजे
आमचा विश्वास तुकाराम मुंढे यांच्यावर आहे, तपासाची जी समिती आहे ते तपास करतील. आम्हाला काही विद्यार्थी येऊन भेटून गेले आहेत, ते विद्यार्थी तुकाराम मुंढेंनादेखील भेटतील, त्यांना पुरावे देतील आणि लवकरात लवकर सगळे शोधून काढतील, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षांबाबत नकारात्मक आम्हाला काही मिळाले नाही. आता, तपास करून कारवाई कडक झाली पाहिजे, असेही पवार यांनी नमूद केले.





