pune : ‘लहरा दो तिरंगा’चा पुण्यात एल्गार!
pune :

सीजेपी’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
मतदार यादी रद्द करण्यासह निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
pune : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) च्या वतीने शनिवारी ‘लहरा दो तिरंगा’ या अभियानांतर्गत जोरदार निदर्शने आणि तिरंगा हातात घेऊन आंदोलन करण्यात आले.
दिल्लीतील जंतरमंतर येथे राष्ट्रध्वज फडकवल्याप्रकरणी पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप करीत त्यांच्या तत्काळ सुटकेची मागणी यावेळी करण्यात आली. यासोबतच २०२४ ची मतदार यादी तातडीने रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा मागण्या आंदोलकांनी केली.
प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन सायंकाळच्या सुमारास हे आंदोलन पार पडले. हातात तिरंगा घेऊन शेकडो कार्यकर्ते, नागरिक आणि समर्थक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले होते. इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय, या देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
लोकशाहीची मूल्ये टिकवून ठेवणे आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे या हेतूने नागरिकांना एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
देशातील लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप करीत उपस्थितांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले.
आता देशात प्रश्न विचारणेही धोक्याचे झाले आहे. कारण नसताना कुणालाही अटक करणे हे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत आंदोलनात सहभागी झालेल्यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.





