Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघासाठी आज मतदान; 25 जागांसाठी एकूण 50 उमेदवार रिंगणात
Gokul Milk Union Election: या निवडणुकीत 5 हजार 418 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

Gokul Milk Union Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) आज मतदान पार पडत आहे. ‘गोकुळ’साठी आज रविवारी जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी सर्व मतदान केंद्र पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर उद्या सोमवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी पार पडेल.
सकाळी आठपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर मतदान होत आहे. सर्वाधिक पाच केंद्रे करवीर तालुक्यात असून, गगनबावडा व हातकणंगले तालुक्यात केवळ प्रत्येकी एकच केंद्र आहे. या निवडणुकीत 5 हजार 418 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. संचालक पदाच्या 25 जागांसाठी एकूण 50 उमेदवार रिंगणात आहे.
प्रत्येक मतदान केंद्रात मोबाइल फोन घेऊन जाण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच, मतपत्रिकेचा फोटो काढून तो मोबाइलवर व्हायरल केल्यास किंवा काढल्यास संबंधितांवर कडक फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
गेली पंधरा दिवस गाठीभेटी, संपर्क सभांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. शुक्रवारी प्रचाराची सांगता झाली. त्यानंतर आज मतदान होत आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे. सर्वसाधारण गटातील मतांची मोजणी करण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुलनेने राखीव गटातील जागांचे निकाल आधी घोषित केले जातील.
अनेकांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि मविआच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडीक या महायुतीच्या नेत्यांसह काँग्रेस समविचारी आघाडीचे आमदार सतेज पाटील व भाजपची पक्ष म्हणूनही प्रतिष्ठा पणास लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा :





