Top 15 News: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही! , ध्रुव राठीची लंडनमध्ये आंदोलनाची हाक आणि ‘बिग बॉस २०’मध्ये आणखी एक एक्झिट?, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अस ते म्हणाले.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!
एकनाथ शिंदेंचा बळीराजाला शब्द
Top 15 News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अस ते म्हणाले. डोंबिवलीतील नवरात्रोत्सवात त्यांनी देवीची आरती केली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत सुपूर्द केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा रास-दांडिया रद्द करून निधी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘बावनकुळेंच्या संपत्तीची चौकशी केली तर…’
हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार
अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या SIT चौकशीच्या वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले, त्यांच्या संस्थेबाबत SIT चौकशीची भाषा करणे हा विदर्भाचा अपमान असल्याचे सपकाळ म्हणाले. तसेच बावनकुळेंच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी परदेशातील कथित व्यवहारांवरूनही प्रश्न उपस्थित केले. सपकाळ यांच्या आरोपांवर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी;
दुष्काळात नागरिकांना दिलासा
राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा आणि दुष्काळाचे संकट कायम असताना कोल्हापूर, धुळे, सांगली आणि चिपळूणसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. धुळ्यात अडीच महिन्यांनंतर, तर चिपळूणमध्ये महिनाभरानंतर पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील काही गावांतही मुसळधार सरी कोसळल्या. गोव्यातही पाऊस झाला. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, पाण्याची टंचाई आणि पिकांचे नुकसान लक्षात घेता दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
FDA अधिकाऱ्यांना झिरवाळांचा इशारा;
दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईवरून राज्यात चर्चा सुरू असताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नियमबाह्य कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई केल्याचे सिद्ध झाल्यास निलंबन होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. मालेगावातील सुपारी ट्रक प्रकरणातही कारवाई सुरू आहे. दरम्यान, कोकण व पुणे विभागातील मोहिमेत ४८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयास्पद अन्नसाठा आढळला. पाच गोदामांचे परवाने निलंबित, तर दोन विनापरवाना आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
तुकाराम मुंढेंचा शेतकऱ्यांना सल्ला;
दुष्काळातही संधी, सांगितला उपाय!
दुष्काळाकडे समस्या म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहा, असा सल्ला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला. पिंपरी-चिंचवडमधील ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोमध्ये त्यांनी कमी पाण्यात दुग्धव्यवसाय आणि हायड्रोपोनिक्सचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेवर भर देत गावातील पाणी गावातच जिरवण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. शेतातील पाणी वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक बांधबंदिस्ती करावी, असेही ते म्हणाले. उद्योजकांनी सीएसआरच्या माध्यमातून या कामात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
RNO – महाराष्ट्रात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई;
१,४१० कोटींचे अंमली पदार्थ जप्त Top 15 News:
महाराष्ट्रात अंमली पदार्थांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यभरात ४४ हजार ६१३ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे १ हजार ४१० कोटी रुपये आहे. याप्रकरणी २ हजार ९५७ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी टास्क फोर्स सक्रिय असून, १,४०० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर मोक्कानुसार कारवाई करण्यावरही भर दिला जाणार आहे.
RNO – जप्त सुपारी गेली कुठे? तुकाराम मुंढेंची माहिती;
दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन
नाशिक आणि दिंडोरीतील जप्त सुपारी प्रकरणात चौकशीअंती दोष आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. संपूर्ण सुपारी नष्ट केल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात तेवढी सुपारी नष्ट झाली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. दरम्यान, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी FDA ची कारवाई अधिक कडक होणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. नियमांची पूर्तता न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी आवश्यक सुधारणा होईपर्यंत व्यवसाय सुरू करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
RNO – अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचा प्रचार मेळावा;
दिग्गज नेते मैदानात
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रचाराला वेग दिला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवार आदिती पोहरे यांच्या प्रचारार्थ अमरावतीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन देशमुख, सुनील देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. विविध पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने पोहरे यांच्या प्रचाराला बळ देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या मेळाव्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
RNO – शेतकऱ्यांना दिलेले ५ हजार रुपये अंतिम नाहीत;
पंचनाम्यानंतर मिळणार मदत – गिरीश महाजन
शेतकऱ्यांना दिवाळीसाठी दिलेली पाच हजार रुपयांची अग्रिम रक्कम ही अंतिम मदत नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच महायुतीमध्ये कोणतेही वाद नसून पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
RNO – “तीन मंत्री सांगत आहेत, मोठे भाऊ म्हणून मदत करा!”
गुलाबराव पाटलांचा अशोक उईकेंना टोला
एरंडोल विभागासाठी स्वतंत्र आदिवासी कार्यालय सुरू करण्याच्या मागणीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांना मिश्किल टोला लगावला. “आम्हाला लय त्रास आहे, मेहरबानी करा आणि आदिवासी कार्यालय देऊन टाका,” अशी विनंती त्यांनी केली. “तीन-तीन मंत्री तुम्हाला सांगत आहेत, मोठे भाऊ म्हणून मदत करा,” असे म्हणत त्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मागणीचा पुनरुच्चार केला. आता या मागणीवर अशोक उईके काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
अभिजीत दिपकेंची सुटका;
न्यायालयाकडून जामीन मंजूर Top 15 News:
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाली आहे. शुक्रवारी कनॉट प्लेस परिसरात तिरंगा फडकवण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. आज विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. सुटकेपूर्वी शांतता राखण्याच्या बॉण्डवर स्वाक्षरी करावी लागल्याची माहिती आहे. दिपके यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६ आणि १७० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. सुटकेनंतर ते करोल बाग येथील नेते अनीश गावंडे यांच्या घरी पोहोचले.
ध्रुव राठीची लंडनमध्ये आंदोलनाची हाक;
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग लंडनपर्यंत पोहोचली आहे. युट्यूबर ध्रुव राठीने लंडनमध्ये आंदोलनाचे आवाहन केल्यानंतर भारतीय नागरिक एकत्र आल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतात CJPच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ध्रुव राठीने परदेशातूनही ही मागणी पुढे नेली. दरम्यान, भारतातील आंदोलनादरम्यान त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडल्याचे वृत्त आहे. जुन्या प्रकरणातील न्यायालयीन समन्समुळेही तो चर्चेत आला आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीवर पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.
अमेरिकेकडून भारताला मोठा दिलासा
भारतावर १००% शुल्काचा निर्णय रोखला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या पाच देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याच्या तरतुदीला स्थगिती दिली आहे. रशियाला लक्ष्य करणाऱ्या नव्या कायद्यातील काही निर्बंधांची अंमलबजावणीही त्यांनी रोखली. हा निर्णय अमेरिकेच्या राष्ट्रीय हितासाठी घेतल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात सध्याच्या पातळीच्या आसपास कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इशान किशनचा गगनभेदी षटकार!
भारत-वेस्ट इंडिज सामना पावसामुळे रद्द
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बंगळूरुमधील पाचवा निर्णायक टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. सामन्यात केवळ ७.४ षटकांचा खेळ झाला. भारताने या छोटेखानी डावात ११८ धावा ठोकल्या. इशान किशनने १० चेंडूंत ३०, तर नमन धीरने सहा चेंडूंत २४ धावा केल्या. इशानचा एक षटकार थेट स्टेडियमबाहेर गेल्याने नवीन चेंडू आणावा लागला. पाचवा सामना रद्द झाल्याने पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.
‘बिग बॉस २०’मध्ये आणखी एक एक्झिट?
अमन गांधी घराबाहेर पडणार असल्याची चर्चा Top 15 News:
सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस २०’मध्ये दररोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. वाईल्ड कार्ड स्पर्धक नकुल ढुल आणि कुशल तन्वर यांच्यातील वादानंतर नकुलला घराबाहेर काढण्यात आले. आता या आठवड्यात अभिनेता अमन गांधीची एक्झिट होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. कमी मते मिळाल्यामुळे अमनचा प्रवास संपल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान काय खुलासा करतो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.





