Walmik Karad : वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला ! उज्ज्वल निकमांकडून जोरदार युक्तीवाद; कोर्टात काय घडलं?

Walmik Karad – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी न्यायालयात विनंती अर्ज केला होता. न्यायालयातील या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली असून बीड सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.
यामुळे देशमुख कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर आता खंडणीसह खूनाचही खटला चालू राहणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे वकील उज्ज्वल निकम यांनी स्वागत केल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील समाधान व्यक्त केले.
वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत गत सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत विरोध केला होता. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता, त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला व संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला.
आता, न्यायालयाच्या निर्णयावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीने जो तपास केला, त्यात ठोस पुरावे आहेत. त्यामुळे कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळला जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. कराडचा दोष मुक्तीचा अर्ज दाखल झाल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा केविलवाला प्रयत्न असल्याचे म्हटले होते.
त्याचाच एक भाग म्हणून आज देखील इतर आरोपींनी दोष मुक्तीचे अर्ज केले आहेत. या लढाईचा शेवट आरोपींना फाशी झाली पाहिजे, असेच आमचे मत असल्याचे देशमुख यांनी म्हटले. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालानंतर उज्ज्वल निकम यांची मस्साजोग ग्रामस्थांनी भेट घेतली आणि या पुढील लढा तुम्हीच लढा अशी विनंती देखील करण्यात आली.
फरारी कृष्णा आंधळेचे काय ?
वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांवर खटला सुरु झाला असला तरी अजूनही यामध्ये सामावेश असलेला कृष्णा आंधळे हा आरोपी सापडलेला नाही. तो अजूनही सापडला नसल्याने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी रोष व्यक्त केला.
ते म्हणाले, तो कुठे आहे? त्याचा एवढे दिवस होवूनही तपास होत नाही, हे तपास यंत्रणांचे अपयश आहे. त्यामुळे पोलीसांनी तातडीने आंधळेला शोधून अटक करावी, अशी मागणी देखील धनंजय देशमुख यांनी यावेळी केली.





