वाकडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

कोपरगाव – वाकडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मागील पंधरा महिन्यापासून वेतन थकल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याबाबत तातडीने तोडगा काढणे गरजेचे होते. आण्णासाहेब कोते यांनी आ.आशुतोष काळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन देखील योग्य होते व दुसरीकडे नागरिकांची देखील अडचण झाली होती. यावर आ.आशुतोष काळे यांनी वेळीच योग्य तोडगा काढल्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचे वेतन मिळणार असून, त्यांनी आपले आंदोलन मागे घेत आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत घरपट्टी, पाणीपट्टी, जागा/गाळा भाडे, पोल्ट्रीचा कर वसूल झाल्याशिवाय वेतन अदा करणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. सर्व कर्मचारी यांनी वसुलीसाठी जबाबदारीने प्रयत्न करावे. कर्मचारी यांची अर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने कर वसुलीची रक्कम जमा होईपर्यंत गावातील पदाधिकारी/लोकप्रतिनिधी यांनी अनामत रक्कम ग्रामपंचायतकडे जमा करून कर्मचारी यांचे वेतन अदा करणेसाठी सहकार्य करावे. ग्रामपंचायतीची कर वसुली झाल्यांनतर अनामत रक्कम त्या व्यक्तींना परत करावी, अशी चर्चा या बैठकीत झाली होती.
त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी आण्णासाहेब कोते यांना कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने व्हावे, यासाठी पुढाकार घेण्यास सांगून तीन लाख रुपयांची रक्कम अनामत म्हणून वाकडी ग्रामपंचायतीस देण्यास सांगितले. त्या सूचनेनुसार आण्णासाहेब कोते यांनी तीन लाखांचा धनादेश ग्रामविकास अधिकारी संतोष सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचे वेतन मिळनार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले. गावातील पाणी पुरवठा व कार्यालयीन कामकाज सुरळीत झाले. ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय देखील दूर झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबरोबरच वाकडी ग्रामस्थांनी देखील आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.





