नाशिक – शहरातील फिजिक्सवाला या खाजगी कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिकमधील शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये घडली. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोचिंग क्लासमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी क्लास मॅनेजरच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कोचिंग क्लासमध्ये बहुसंख्य विद्यार्थी मराठी असून, क्लासमधील शिक्षक हे परप्रांतीय आहेत. त्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांना हिंदी समजण्यात अडचणी येत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वारंवार वाद होत असल्याची तक्रार मनविसेकडून करण्यात आली आहे. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना मराठीत शिकवणार नाही, शिकायचे असेल तर हिंदीतच शिका, अशी अरेरावी केली. यासोबतच मराठी भाषेला गावठी म्हणून हिणवल्याचा आरोपही मनसेकडून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवर दादागिरी करणे, धमक्या देणे, मराठीत बोलण्यास मज्जाव करणे, या मुद्द्यांवरून व्यवस्थापनाला मनसेकडून धारेवर धरण्यात आले. याच वादात मराठी बोलण्यास विरोध करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. क्लासमधील सर्व परप्रांतीय शिक्षकांचे सात दिवसांत राजीनामे घ्यावेत आणि त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा पुन्हा मनसे स्टाईल आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.