Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! युथ वनडेत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

Vaibhav Suryavanshi Records : भारताचा युवा अंडर-19 फलंदाज वैभव सूर्यवंशीने युथ वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याने माजी भारतीय अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधार उन्मुक्त चंदचा रेकॉर्ड मोडला आहे. ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध दुसऱ्या युथ वनडे सामन्यात वैभवने 6 षटकार मारत हा विक्रम आपल्या नावावर केला. आतापर्यंत वैभवने अंडर-19 वनडेमध्ये 10 डावांत 41 षटकार मारले आहेत, तर उन्मुक्त चंद याने 21 डावांत 38 षटकार मारले होते.
सध्या वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे भारतीय संघ तीन युथ वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिल्या वनडेमध्ये 38 चेंडूत दमदार खेळी केल्यानंतर, दुसऱ्या वनडेमध्ये वैभवने 68 चेंडूत 70 धावांची खणखणीत खेळी केली. कर्णधार आयुष म्हात्रे शून्यावर बाद झाल्यानंतर वैभवने दुसऱ्या गड्यासाठी मजबूत भागीदारी करत संघाला सावरले. मात्र, आर्यन शर्माच्या शानदार झेलमुळे वैभवला मोठी खेळी करता आली नाही.
वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास –
वैभवने या 70 धावांच्या खेळीत 6 षटकार मारले, ज्यामुळे त्याने 10 डावांत 41 षटकारांचा टप्पा गाठला. युथ वनडेमध्ये त्याने आतापर्यंत 540 धावा केल्या असून, त्यापैकी 26% धावा बाउंड्रींद्वारे आल्या आहेत. युथ वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी अव्वल आहे, तर उन्मुक्त चंद (38 षटकार), जव्वाद अबरार (35 षटकार), शहजैब खान (31 षटकार), तौहीद हृदय आणि यशस्वी जायसवाल (प्रत्येकी 30 षटकार) यांचा क्रम लागतो. भारतीय खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वाल, जो सध्या भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे, तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – Sourav Ganguly : सौरव गांगुलीचे दमदार पुनरागमन, पुन्हा अध्यक्षपदी विराजमान; पदभार स्वीकारताच केली मोठी घोषणा
वैभवचे अनेक विक्रम –
Teenage sensation Vaibhav Suryavanshi smashes the all-time Youth ODI sixes record during the second India U-19 vs Australia U-19 match.#VaibhavSuryavanshi pic.twitter.com/sYSLeMUK9g
— CricTracker (@Cricketracker) September 24, 2025
बिहारमधील समस्तीपूर येथील वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 2023-24 च्या रणजी करंडक हंगामात वयाच्या अवघ्या 12 वर्षे आणि 284 दिवसांत त्याने मुंबईविरुद्ध पदार्पण करत रणजी करंडकातील सर्वात कमी वयाचा खेळाडू होण्याचा मान मिळवला. तसेच, त्याने 52 चेंडूत शतक ठोकत युथ वनडेमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम नोंदवला आणि पाकिस्तानच्या कामरान गुलामचा सहा वर्षांपूर्वीचा 53 चेंडूंतील शतकाचा विक्रम मोडला. याच खेळीत वैभवने एका सामन्यात सर्वाधिक 10 षटकार मारण्याचा भारतीय विक्रमही नोंदवला.
हेही वाचा – Dickie Bird : क्रीडा विश्वावर शोककळा ! महान अंपायर डिकी बर्ड यांचं निधन
वयाच्या 13 वर्षे आणि 188 दिवसांत वैभवने स्पर्धात्मक क्रिकेटच्या 170 वर्षांच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक झळकावणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या युथ कसोटी सामन्यात त्याने 58 चेंडूत शतक ठोकत भारतीय खेळाडूंमध्ये युथ स्तरावरील सर्वात जलद शतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला.वैभव सूर्यवंशीच्या या दमदार कामगिरीमुळे तो भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा उज्ज्वल तारा मानला जात आहे. त्याच्या बॅटमधून असेच शानदार प्रदर्शन पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
युथ वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
- वैभव सूर्यवंशी (भारत) – 10 सामने – 41 षटकार
- उन्मुक्त चंद (भारत) – 21 सामने – 38 षटकार
- जव्वाद अबरार (बांगलादेश) – 24 सामने – 35 षटकार
- शहजैब खान (पाकिस्तान) – 24 सामने – 31 षटकार
- तौहीद हृदय (बांगलादेश) – 47 सामने – 30 षटकार
- यशस्वी जैस्वाल (भारत) – 27 सामने – 30 षटकार





