RR vs LSG : वैभव सूर्यवंशीने केला ऐतिहासिक पराक्रम! आयपीएलच्या इतिहासातील ठरला सर्वात तरुण पदार्पणवीर

Vaibhav Suryavanshi IPL Debut at 14 Years age in RR vs LSG : १९ एप्रिल २०२५ हा दिवस आयपीएलच्या इतिहासात एका अद्भुत विक्रमासाठी कायमचा नोंदवला जाईल. आयपीएल २०२५ च्या ३६ व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला या लीगमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यासह, तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. डावखुरा फलंदाज वैभवने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळाली, ज्यामध्ये संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
वैभवला सॅमसनच्या जागी मिळाली संधी –
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेकीसाठी संजू सॅमसनच्या जागी रियान पराग आला. रियानने नाणेफेक जिंकली नाही, पण त्याने संघातील बदलांची घोषणा करताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरु झाला. रियानने घोषणा केली की वैभव सूर्यवंशी या सामन्यातून पदार्पण करेल. या घोषणेसह, वैभवचे नाव आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून कायमचे नोंदवले गेले आहे.
Keep working hard and keep making us proud, Vaibhav 🩷 pic.twitter.com/nuFh4myKmw
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 19, 2025
वैभव ठरला सर्वात तरुण खेळाडू –
या हंगामात पहिल्या ७ पैकी ५ सामन्यांमध्ये पराभव पत्करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात बदलाची मागणी होती. चाहतेही अनेक वेळा वैभवला संधी देण्याची मागणी करत होते. पण वरच्या फळीत जागा नसल्याने, फक्त सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या वैभवला संधी मिळत नव्हती. पण कर्णधार सॅमसनच्या दुखापतीमुळे त्याच्यासाठी एक संधी निर्माण झाली. गेल्या सामन्यात सॅमसनला दुखापत झाली आणि तो वेळेत त्यातून सावरू शकला नाही. अशा परिस्थितीत डावखुरा वैभवला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि १४ वर्षे २३ दिवसांच्या वयात तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
हेही वाचा – GT vs DC : बटलरच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातचा दणदणीत विजय, दिल्लीचा दुसरा पराभव
लखनौने राजस्थानाला दिले १८१ धावांचे लक्ष्य –
एडन मारक्रमचे अर्धशतक आणि आयुष बदोनीच्या अर्धशतकाच्या मदतीने लखनौने राजस्थानसमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत पाच गडी गमावून १८० धावा केल्या. मारक्रम आणि बदोनी व्यतिरिक्त, अब्दुल समदने त्यांच्याकडून १० चेंडूत ३० धावांची दमदार खेळी केली. राजस्थानकडून वानिंदू हसरंगाने दोन तर जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





