Sunil Gavaskar Criticize: “आता कुठे गेली ती चिठ्ठी, खिशातच आहे ना?”, आकाश सिंगला सुनील गावस्करांनी लाईव्ह कॉमेंट्रीत सुनावलं
Sunil Gavaskar Criticize : सुनील गावस्करांनी लाईव्ह कॉमेंट्रीत आकाश सिंगच्या त्याच्या 'चिठ्ठी' सेलिब्रेशन निशाणा साधला आहे.

Sunil Gavaskar criticized Akash Singh for Parchi Celebration : आयपीएल २०२६ च्या ६४ व्या सामन्यात राजस्थान लखनौ सुपर जायंट्सचा ७ विकेट्सनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात लखनऊने २२० धावांचा अवाढव्य डोंगर उभारूनही राजस्थानच्या फलंदाजांनी त्यांचा सहज धुव्वा उडवला. या सामन्यात सर्वाधिक धुलाई झाली ती लखनौचा वेगवान गोलंदाज आकाश सिंह याची. आकाशने अवघ्या ३ षटकांत ५४ धावा दिल्या. यानंतर सुनील गावस्करांनी लाईव्ह कॉमेंट्रीत त्याच्या ‘चिठ्ठी’ सेलिब्रेशन निशाणा साधला आहे.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात चमकलेला आकाश सिंग आपल्या आगळ्यावेगळ्या ‘चिठ्ठी (पर्ची) सेलिब्रेशन’मुळे चर्चेत आलेला होता. मात्र राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याला माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करांच्या ( Sunil Gavaskar )टीकेला सामोरे जावे लागले. आकाश सिंगच्या या सामन्यातील खराब कामगिरीवर आणि मैदानातील वर्तनावर सुनील गावस्कर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. (Sunil Gavaskar Criticize)
वैभव सूर्यवंशीने बिघडवली लाईन-लेन्थ; गावस्करांचा थेट हल्ला (Sunil Gavaskar Criticize)
२२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला आकाश सिंगने (Aksh Singh) सुरुवातीला यशस्वी जैस्वालला बाद करून एक ब्रेकथ्रू मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर मात्र १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आकाश सिंगची पिसं काढली. वैभवने आकाशच्या चेंडूवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ज्यामुळे आकाश पूर्णपणे हतबल झालेला असताना, कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले सुनील गावस्कर त्याच्यावर प्रचंड भडकले.
Sunil Gavaskar on chit..👀 pic.twitter.com/oELd1e5YTs
— RVCJ Media (@RVCJ_FB) May 20, 2026
गावस्कर थेट निशाणा साधत लाईव्ह कॉमेंट्रीत म्हणाले, “आता कुठे गेली ती चिठ्ठी? खिशातच आहे ना? आता का नाही काढत बाहेर? खेळाडूंमध्ये थोडा संयम आणि शांत स्वभाव असायला हवा. एका चेंडूवर विकेट मिळाली तर ठीक आहे, पण इतर चेंडूंवर जेव्हा फलंदाज तुमची धुलाई करतो.” गावस्करांनी पुढे संतापून सांगितले की, आकाशने अवघ्या १७ चेंडूंत ४८ धावा दिल्या होत्या, अशा स्थितीत मैदानावर विनाकारण ‘अॅटिट्यूड’ दाखवणे योग्य नाही.
काय होते ते ‘चिठ्ठी सेलिब्रेशन’? (Sunil Gavaskar Criticize)
यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात आकाश सिंगने २६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्यात तो प्रत्येक विकेट घेतल्यानंतर खिशातून एक चिठ्ठी काढून पाहताना आणि दाखवताना दिसला होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावर नंतर आकाशने स्पष्टीकरण दिले होते की, “हे सेलिब्रेशन कोणाला चिडवण्यासाठी नव्हते, तर स्वतःला प्रवृत्त (मोटिव्हेट) करण्यासाठी मी ती चिठ्ठी खिशात ठेवली होती.” मात्र, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याची हीच चिठ्ठी आणि सेलिब्रेशन त्याच्या अंगाशी आले आहे.





