Vaibhav Sooryavanshi Post : “चाहत्यांनो आम्हाला माफ करा…”; राजस्थान रॉयल्स बाहेर पडल्यानंतर वैभव सूर्यवंशीची भावनिक पोस्ट व्हायरल
Vaibhav Sooryavanshi Post : आयपीएल २०२६ मध्ये, क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत झाल्यामुळे राजस्थान रॉयल्स स्पर्धेतून बाहेर पडला. या पराभवाने राजस्थानचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.

Vaibhav Sooryavanshi emotional post Viral after RR defeat : आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या दारुण पराभवासोबतच राजस्थानचे पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने ९६ धावांची अप्रतिम खेळी केली होती, परंतु तरीही गोलंदाजांच्या अपयशामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अवघ्या १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी पूर्णपणे खचून गेला असून, त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावूक पोस्ट सध्या कमालीची व्हायरल होत आहे.
“आजची रात्र खूप वेदनादायी…”, इन्स्टा स्टोरीवर व्यक्त केल्या भावना
आयपीएल २०२६ मधून बाहेर पडल्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर एक अत्यंत इमोशनल स्टोरी पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “२० ओव्हर्सच्या खेळात माणसाच्या भावना किती वेगाने बदलू शकतात, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. आजची रात्र आमच्यासाठी अत्यंत दुःखाची आणि वेदनादायी आहे. हा पराभव आमच्या मनाला खूप चटके लावून जात आहे. आज आम्हाला या दुःख, नैराश्य आणि फ्रस्ट्रेशनसोबतच बसावे लागेल. पण, शुबमन गिल आणि गुजरात टायटन्सच्या संघाने आज रात्री खरोखरच अप्रतिम कामगिरी केली, त्यांच्या या विजयाचे श्रेय त्यांना नक्कीच मिळायला हवे.”
वैभवने मानले चाहत्यांचे आभार; मागितली जाहीर माफी!
🚨📱 Vaibhav Sooryavanshi reacts on social media after Rajasthan Royals’s loss to Gujarat Titans.
He reposted the franchise’s post with an emotional message on Instagram pic.twitter.com/WS4jjIDsCg
— TheWicketReport (@WicketReport) May 30, 2026
वैभव सूर्यवंशीने आपल्या पोस्टमध्ये पुढे राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, “ज्यांनी या आमच्या युवा संघावर विश्वास ठेवला, प्रत्येक परिस्थितीत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि या हंगामातील सर्व १६ सामन्यांमध्ये आम्हाला पाठिंबा दिला, त्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. परंतु, एक संघ म्हणून मला या गोष्टीचे प्रचंड दुःख आहे की, आम्ही तुम्हाला ती ऐतिहासिक रात्र देऊ शकलो नाही ज्याचे तुम्ही खरोखरच हक्कदार होतात. जेव्हा तुम्हाला आमच्या विजयाची सर्वात जास्त गरज होती, नेमके त्याच वेळी आम्ही तुमची निराशा केली, याचा मला मनापासून पश्चात्ताप होत आहे.”
७७६ धावांसह वैभवकडेच ‘ऑरेंज कॅप’, पण गिल देणार टक्कर!
वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडत अनेक विक्रम मोडले आहेत. तो आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून १६ सामन्यांत ७७६ धावांसह ‘ऑरेंज कॅप’ सध्या त्याच्याकडेच सुरक्षित आहे. मात्र, या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर गुजरातचा कर्णधार शुबमन गिल असून त्याने आतापर्यंत ७२२ धावा केल्या आहेत. वैभव आणि गिल यांच्यात आता फक्त ५४ धावांचा फरक उरला आहे. जर रविवारी होणाऱ्या फायनल सामन्यात शुबमन गिलने ५५ धावा केल्या, तर ऑरेंज कॅप वैभवच्या हातातून निसटून गिलच्या नावावर होईल.





