Pune District : वढूचा कलाकार मोठ्या पडद्यावर
Pune District : ग्रामीण मातीत फुलणारी प्रेमकहाणी, मैत्री, नातेसंबंध, संघर्ष, राजकारण, आयुष्यातील अनपेक्षित वळणे यांची सांगड या चित्रपटातून घातली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

कोरेगाव भीमा : ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळाल्यास ते रुपेरी पडद्यावरही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात, याचा प्रत्यय शिरूर तालुक्याला पुन्हा एकदा येणार आहे. वढू बुद्रुक येथील युवा कलाकार सागर भंडारे आगामी ‘धप्पा’ या मराठी चित्रपटातून मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन रविराज लिंबादास वाव्होळे यांनी केले आहे. पेरणे फाटा परिसरातील झोपडपट्टीत बालपण घालवलेल्या वाव्होळे यांनी संघर्षातून चित्रपट दिग्दर्शक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सागर भंडारे आणि अभिनेत्री प्रतिक्षा अत्राम ही नवोदित जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ग्रामीण मातीत फुलणारी प्रेमकहाणी, मैत्री, नातेसंबंध, संघर्ष, राजकारण, आयुष्यातील अनपेक्षित वळणे यांची सांगड या चित्रपटातून घातली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन रविराज लिंबादास वाव्होळे यांनी केले असून कथा, पटकथा व संवाद सागर गीता चांगदेव भंडारे यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची निर्मिती सपना पोपट ढेरंगे, माधुरी राहुल दिवसे, सागर गीता चांगदेव भंडारे यांनी केली आहे. विनोद दत्तात्रय भंडारे, अजित साहेबराव भंडारे आणि शंभु सचिन भंडारे हे सहनिर्माते आहेत.
रविराज वाव्होळे यांचा प्रवास विशेष उल्लेखनीय आहे. पेरणे फाटा परिसरातील झोपडपट्टीत बालपण गेलेल्या वाव्होळे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून कलाक्षेत्राची वाट धरली. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून आलेल्या या युवकाने चित्रपटसृष्टीत स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आज त्याच परिसरातून आलेल्या कलाकाराच्या प्रमुख भूमिकेला दिग्दर्शनाची साथ देण्याची संधी त्यांना मिळाली आहे. यापूर्वी रविराज वाव्होळे आणि सागर भंडारे यांनी ‘तराट’ या चित्रपटासाठीही एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद वाव्होळे आणि सागर भंडारे यांनी लिहिले होते. त्यामुळे ‘धप्पा’ हा त्यांच्या कलात्मक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
शिरूरच्या मातीत कलेची समृद्ध परंपरा
शिरूर तालुका हा केवळ शेती, उद्योग आणि राजकीय क्षेत्रासाठीच नव्हे, तर कला-साहित्य आणि लोकपरंपरेसाठीही ओळखला जातो. तालुक्यातील कवठे येमाई येथील प्रसिद्ध साहित्यिक, गीतकार, लोककलावंत, लेखक आणि कवी बी. के. मोमीन कवठेकर यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण लोककला व लोकरंगभूमीला मोठे योगदान दिले. त्यांनी विविध नामांकित लोकनाट्य मंडळांत काम केले तसेच तमाशा क्षेत्रात लेखक म्हणून स्वतंत्र ठसा उमटविला आहे.
गुनाटचीही लोककलेची स्वतंत्र ओळख
गुनाट गावाचीही लोककलेची स्वतंत्र ओळख आहे. गुनाटला लोककलावंतांची पंढरी म्हणून ओळखले जाते. दादू भालेराव, दादू जाधव आणि सोनबा गुनाटकर यांसारखे नामवंत तमाशा फडमालक याच परिसरातून पुढे आले. अनेक कलाकारांनी आपले आयुष्य तमाशा, लोकनाट्य आणि पारंपरिक कलेसाठी वाहून घेतले. शिरूरच्या कला परंपरेचा वारसा आजही पुढे सुरू आहे. शिरूर येथे झालेल्या कलावंतांच्या सन्मान सोहळ्यात विलास महाराज पवार, भजनसम्राट श्रीहरी मेंदरकर, संगीतकार सौरभ मास्तोळी, लोकशाहीर बाळासाहेब कान्हेरे, ताशा सम्राट याकुबभाई मणियार, संबळ वादक दगडू घोगरे, ढोलकी वादक सुरेश चव्हाण आदी लोककलावंतांचा गौरव केला होता.
पिंपरखेडपासून रुपेरी पडद्यापर्यंत हेमंत ढोमे
शिरूर तालुक्याचा चित्रपटसृष्टीशी असलेला संबंध सांगताना पिंपरखेडचे अभिनेते-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागतो. ढोमे यांचा जन्म शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे झाला असून त्यांनी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे.





