Pune District : धोकादायक विहीर जीवावर बेतणार; निमगाव म्हाळुंगीत संरक्षक कठडे बसवा
Pune District : निमगाव म्हाळुंगी येथील भागवत वस्तीयेथे रस्त्याच्या कडेला धोकादायक विहिर असून धोकादायक विहिरीबाबतची माहिती स्थानिकांनी ग्रामपंचायत व प्रशासनाला दिलेली आहे.

शिक्रापूर : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील भागवत वस्तीयेथे रस्त्याच्या कडेला धोकादायक विहिर असून विहिरीमुळे एखादा अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने सदर विहिरीला संरक्षक कठडे बसविण्याची मागणी माजी उपसरपंच कानिफनाथ गव्हाणे, माऊली चव्हाण, वैभव भागवत व कांतिलाल गवते यांनी केली आहे.
निमगाव म्हाळुंगी येथील भागवत वस्तीयेथे रस्त्याच्या कडेला धोकादायक विहिर असून धोकादायक विहिरीबाबतची माहिती स्थानिकांनी ग्रामपंचायत व प्रशासनाला दिलेली आहे. गावापासून काही अंतरावर कोल्हापूर बंधाऱ्याजवळ धोकादायक ठरू शकणारी ही विहीर सध्या पाण्याने तुडुंब भरलेली आहे.
पावसामुळे विहिरीची कडेने पडझड झाल्याने विहिर जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. तर भागवत वस्ती, चव्हाण वस्ती, गव्हाणे वस्ती, मराठे वस्ती, नाणेकर वस्ती, चौघुले वस्ती, करंजावणे येथील शिंदेवस्ती, पारोडी, दहिवडी, सातकरवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी गावच्या नागरिकांचे दळणवळण या रस्त्याने होत आहे.
अनेक विद्यार्थी शाळेसाठी ये- जा करतात, तर परिसरातील अनेक शेतकरी, दूध व्यावसायिकच रस्त्याने आपल्या शेतमालाची रात्री अपरात्री वाहतूक करतात. विहीर मालकांनी लोखंडी रेलिंग लावून धोका कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
परंतु पावसामुळे विहिरीची काही प्रमाणात पडझड झाल्याने विहीर धोकादायक बनली आहे. प्रशासनाने विहिरीला भक्कम संरक्षक कठडे बसवून पुढील धोका टाळावा, अशी मागणी माजी उपसरपंच कानिफनाथ गव्हाणे, माऊली चव्हाण, वैभव भागवत, कांतिलाल गवते यांनी केली आहे.





