Pune District : भाजीपाल्याला भाव नाही; शेतकरी आर्थिक विवंचनेत!
Pune District : पुणे शहर तसेच मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये शेतीमाल पाठविण्याची सुविधा असल्याने पूर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते.

सोरतापवाडी : इंधन, खते, कीटकनाशके, बियाणे आणि मजुरीच्या वाढत्या दरामुळे शेतीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना भाजीपाल्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने पूर्व हवेलीतील भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव कमी मिळत असल्याने अनेकदा काढणी व वाहतूक खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईचा मोठा फटका भाजीपाला शेतीला बसत असून शेतकर्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
पुणे शहर तसेच मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये शेतीमाल पाठविण्याची सुविधा असल्याने पूर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. मात्र भाजीपाला पिकविताना मशागत, लागवड, खते, औषध फवारणी, पाणी, मजुरी, काढणी आणि वाहतूक यावर मोठा खर्च करावा लागतो. इंधनाच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टर, पाणीपंप तसेच बाजारपेठेपर्यंत माल वाहून नेण्याचा खर्च वाढला आहे. त्याचबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाण्यांच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन खर्चात मोठी भर पडली आहे. मात्र बाजारात भाजीपाल्याला त्यामानाने दर मिळत नसल्याने शेतकर्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नसल्याचे चित्र आहे.
मेथी, कोथिंबिरीलाही कवडीमोल दर
सध्याच्या बाजारभावानुसार मेथीच्या शंभर जुड्यांना केवळ 300 ते 500 रुपये, म्हणजे एका जुडीला तीन ते पाच रुपये मिळत आहेत. कोथिंबिरीचा दर शंभर जुड्यांना 100 ते 300 रुपये, तर शेपूचाही साधारण असाच दर मिळत आहे. कांदापातीला सुमारे पाच रुपये जुडी, तर मुळ्याला सात रुपये जुडी असा दर मिळत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. भेंडी, गवार, दोडका, वाटाणा, घेवडा, दुधी भोपळा आणि मिरची यांना साधारण 30 ते 60 रुपये किलो दर मिळत आहे. काकडी व टोमॅटोचे दर मात्र तुलनेने कमी असून 15 ते 35 रुपये किलो या दरम्यान आहेत.
कांद्याला भाव; मात्र मालच उपलब्ध नाही
कांद्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत असला तरी पूर्व हवेलीतील मोजक्या शेतकर्यांकडेच कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे कांद्याच्या चांगल्या दराचा फायदा बहुतांश भाजीपाला उत्पादकांना घेता येत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय, मात्र बाजारभाव घटतोय. अशा दुहेरी संकटात पूर्व हवेलीतील भाजीपाला उत्पादक शेतकरी सापडले आहेत. शासनाने भाजीपाला उत्पादकांसाठी योग्य बाजारव्यवस्था, थेट विक्रीची सुविधा, शीतगृह व साठवणूक व्यवस्था तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभावासारखी प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.
-दत्तात्रय चौधरी, शेतकरी, पेठशेतीमालाला योग्य भाव मिळाला तरच वाढत्या उत्पादन खर्चाचा भार कमी होऊन शेतकर्यांना दिलासा मिळू शकतो. अन्यथा वाढत्या खर्चाच्या तुलनेत कमी उत्पन्नामुळे भाजीपाला शेती करणे दिवसेंदिवस जिकिरीचे होण्याची शक्यता आहे.
-मोहन कुंजीर, शेतकरी, वळती





