Pune District : शिरूरच्या राजकीय पटलावर नेतृत्वाची पोकळी
Pune District : मागील काळात नगरपरिषदेतील राजकीय निर्णयांमध्ये धारीवाल यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या राजकीय भूमिकेला अनुसरून नगरपरिषदेतील अनेक समीकरणे जुळत असल्याचे चित्र होते.

शिरूर : प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत पूर्वीप्रमाणे सक्रिय राजकारणातून अलिप्ता ठेवल्याने शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात धाक राहिला नाही. प्रकाश धारिवाल यांचे शिरूर शहरावर एकहाती वर्चस्व होते. मात्र,सध्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू असून कुणावरही अंकुश राहिलेला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
धारीवाल यांचा नगरपरिषदेच्या राजकारणावर असलेला प्रभाव आणि अनेक वर्षांपासून असलेला एकहाती राजकीय अंकुश लक्षात घेता, त्यांच्या तुलनेने शांत भूमिकेमुळे शहरातील सत्ता समीकरणांमध्ये वेगवेगळ्या बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत.
मागील काळात नगरपरिषदेतील राजकीय निर्णयांमध्ये धारीवाल यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या राजकीय भूमिकेला अनुसरून नगरपरिषदेतील अनेक समीकरणे जुळत असल्याचे चित्र होते. त्यामुळे ‘धारीवाल म्हणतील तेच अंतिम’ अशी राजकीय प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र, यंदाच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी बाजूला राहण्याचा निर्णय घेतला होता.
शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यास त्याचा थेट परिणाम नगरपरिषदेतील सत्तासमीकरणावर होऊ शकतो. एखाद्या गटाला बहुमतासाठी या नगरसेवकांची साथ आवश्यक ठरल्यास त्यांचे राजकीय महत्त्व अचानक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात उपनगराध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या निवडीपासून ते महत्त्वाच्या ठरावांपर्यंत प्रत्येक निर्णयात नवे राजकीय समीकरण दिसून येण्याची शक्यता आहे.
एकूणच, धारीवाल यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी घेतलेली राजकारणातून माघार, भाजप-राष्ट्रवादीतील संभाव्य विसंवाद आणि शरदचंद्र पवार गटाच्या नगरसेवकांची स्वतंत्र भूमिका यामुळे शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात नवे सत्ता समीकरण आकार घेत आहे. आगामी काही दिवसांत कोणता गट कोणाच्या जवळ जातो आणि कोण कोणापासून दूर राहतो, यावर शिरूरच्या राजकीय सत्तेची पुढील दिशा निश्चित होणार आहे.
भाजप-राष्ट्रवादीमध्येही विसंवाद?
नगरपरिषद निवडणुकीनंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील समीकरणेही स्पष्टपणे बदलताना दिसत आहेत. सुरुवातीला एकमेकांना पूरक ठरतील अशी अपेक्षा असलेल्या गटांमध्ये आता काही मुद्द्यांवर विसंगती आणि मतभेद दिसून येत असल्याची चर्चा आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नगरसेवकांनी घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेमुळे नगरपरिषदेतील सत्तेचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे कोणता गट कोणाच्या सोबत राहणार, कोणत्या विषयावर कोणाची भूमिका काय असणार, सत्तेच्या केंद्रस्थानी कोण राहणार, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष
धारीवाल यांनी स्वतः नगरपरिषदेच्या राजकारणापासून अंतर ठेवले,त्यामुळे शिरूरच्या राजकारणात फार मोठी उलथापालथ झाली. आतापर्यंत एखाद्या प्रभावशाली नेत्याच्या भूमिकेभोवती फिरणारे राजकारण आता नगरसेवकांच्या संख्याबळावर आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिकांवर केंद्रित होऊ शकते. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले तरी केवळ संख्याबळ पुरेसे ठरणार का, हा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवकही फुटणार असल्याची चर्चा शहरामध्ये आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक कोणती भूमिका घेतात, यावर अनेक निर्णयांचे भवितव्य अवलंबून आहे.





