Pune District : वाल्हे येथे ‘गोपाल कृष्ण महाराजांचा’ जयघोष
Pune District : यावेळी, वीणा पारायण, हरिनाम, भजन आदी कार्यक्रमांमध्ये भाविकांनी सहभाग घेतला. त्यामुळे आठवडाभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण होते. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

वाल्हे : गोपाल कृष्ण महाराज की जय’च्या जयघोषाने वाल्हे येथील पांडकर उपासक श्रीकृष्ण मंदिर व कमळाईसा महानुभाव मठ पवार उपासक मंदिर परिसर भक्तिमय झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेला पाळणा सोहळा, नामकरण विधी, महिलांची कृष्णजन्माची गीते आणि सामूहिक भजनाने जन्माष्टमी उत्सवाची रंगत वाढली. जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर पांडकर उपासक व कमळाईसा महानुभाव मठ पवार उपासक मंदिरात सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, वीणा पारायण, हरिनाम, भजन आदी कार्यक्रमांमध्ये भाविकांनी सहभाग घेतला. त्यामुळे आठवडाभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण होते. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
शुक्रवारी (दि. ४) श्रीकृष्ण मूर्तीला अभिषेक व पूजा करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. दिवसभर विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर जन्मोत्सव सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कृष्णजन्मानंतर पारंपरिक पद्धतीने पाळणा सजवून त्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली. महिलांनी पाळणा गीते म्हणत पाळणा हलविला.
यादरम्यान, टाळ-मृदुंगाच्या साथीने झालेल्या भजनामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले. जन्मोत्सवानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी रविंद्र पांडकर, उद्योजक सचिन पांडकर, देवीदास पांडकर, चंद्रशेखर पांडकर, मोहन पांडकर, निखील पांडकर, मदन खोचे, परेश खोचे, गोकुळ डोईफोडे, शंकर भुजबळ, ज्ञानदेव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





