Pune District : ई-पीक पाहणीवर महसूल सेवकांचा बहिष्कार
Pune District : वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झालेला नसल्याने संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

मंचर : महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेने सन २०२६-२७ च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीच्या कामावर राज्यव्यापी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात आंबेगाव तालुका महसूल सेवक संघटनाही सहभागी झाली आहे. महसूल सेवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ सप्टेंबरपासून ई-पीक पाहणीचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
महसूल सेवक संघटनेने ११ ऑगस्ट रोजी महसूलमंत्री तसेच अपर मुख्य सचिव महसूल यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर २ सप्टेंबर रोजीही महसूलमंत्री व जमाबंदी आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झालेला नसल्याने संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
राज्य संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनात आंबेगाव तालुका महसूल सेवक संघटना पूर्णपणे सहभागी असल्याचे निवेदन घोडेगाव येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांना दिले. मागण्या लवकर मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.तालुका पदाधिकाऱ्यांनी शासनाने तातडीने मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.





