Uttar Pradesh Lok Sabha : उत्तर प्रदेशात ‘या’ बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्याची कॉंग्रेसची तयारी

Uttar Pradesh Lok Sabha Election – लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या तीन टप्प्यांत आपली पूर्ण शक्ती पणाला लावण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. पाचवा टप्पा पक्षासाठी फार महत्वाचा आहे. या टप्प्यात अमेठी, रायबरेली, झाशी आणि बाराबंकी आदी चार जागांवर कॉंग्रेसची भारतीय जनता पार्टीशी लढत आहे.
अमेठी आणि रायबरेली या जागा कॉंग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेतच कारण एका ठिकाणी राहुल गांधी स्वत: तर दुसऱ्या ठिकाणी पक्षाचे व विशेषत: गांधी घराण्याचे अत्यंत निष्ठावान किशोरीलाल शर्मा रिंगणात आहेत.
या दोन्ही जागांची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह ४० नेत्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.
स्वत: प्रियंका गांधी १८ मेपर्यंत दोन्ही मतदारसंघांत प्रचार करणार आहेत. तसेच १७ किंवा १८ तारखेसाठी माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचाराचीही तयारी केली जाते आहे.
बाराबंकी येथून माजी खासदार पी एल पुनीया यांचे पुत्र तनुज पुनीया, अलाहाबाद येथून माजी मंत्री तसेच माजी खासदार आणि समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक रेवती रमण सिंह यांचे पुत्र उज्ज्वल रमण सिंह, वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे उमेदवार आहेत.
माजी मंत्री सदल प्रसाद (बांसगाव), अखिलेश प्रताप सिंह (देवरिया), विरेंद्र चौधरी (महाराजगंज), प्रदीप आदित्य जैन (झाशी) हे पक्षाचे उमेदवार आहेत. कॉंग्रेसने या सगळ्या जागांसाठी प्रियंका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राज बब्बर, सलमान खुर्शिद, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, प्रमोद तिवारी,
सचिन पायलट यांच्यासह अरविंद केजरीवाल आणि इंडिया आघाडीच्या अन्य नेत्यांना प्रचारासाठी बोलावण्याची योजना आखली आहे. हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि सचिन पायलट अगोदरच रायबरेली येथे पोहोचले आहेत. प्रमोद तिवारीही उद्या प्रचारासाठी अमेठीत दाखल होणार आहेत.





