Usman Khawaja announces retirement : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर आणि पाकिस्तानमध्ये जन्मलेला पहिला मुस्लिम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) येथे रविवारपासून सुरू होणारा पाचवा ॲशेस कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील ८८ वा आणि अखेरचा सामना असेल. विशेष म्हणजे, ख्वाजाने याच मैदानावरून आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली होती. ‘वांशिक रूढीवाद’ आणि भेदभावावर ख्वाजाचे रोखठोक भाष्य – निवृत्तीची घोषणा करताना ३९ वर्षीय ख्वाजाने आपल्या कारकिर्दीतील संघर्षावर आणि त्याला सहन कराव्या लागलेल्या वर्णभेदावर (Racial Stereotyping) तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “माझी पाकिस्तानी आणि मुस्लिम पार्श्वभूमी असल्यामुळे आजही मला थोडी वेगळी वागणूक दिली जाते. माझ्याबद्दल ‘आळशी’, ‘स्वार्थी’ आणि ‘संघाची पर्वा न करणारा’ अशा चुकीच्या धारणा पसरवल्या गेल्या. पांढऱ्या वर्णव्यतिरिक्त इतर खेळाडूंबाबत अशा वावड्या उठवल्या जातात, ज्याचा सामना मी आयुष्यभर केला आहे.” टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर – पर्थ कसोटीपूर्वी ख्वाजाने गोल्फ खेळल्यामुळे आणि पर्यायी सराव सत्राला दांडी मारल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. यावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला,”इतर अनेक खेळाडू गोल्फ खेळताना जखमी झाले किंवा सामन्यापूर्वी रात्री मद्यपान करून आजारी पडले, तेव्हा त्यांच्या निष्ठेवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. पण मी दुखापतग्रस्त झालो, तेव्हा माझ्या बांधिलकीवर टीका करण्यात आली. मात्र, मला आनंद आहे की मी माझ्या अटींवर निवृत्त होत आहे.” हेही वाचा – BAR vs HYD : विजय हजारे ट्रॉफीत ऐतिहासिक विक्रम! एकाच सामन्यात ५ शतकांचा पाऊस; बडोद्याचा हैदराबादवर थरारक विजय ख्वाजासाठी सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) नेहमीच लकी राहिले – २०१८: इंग्लंडविरुद्ध याच मैदानावर त्याने १७१ धावा करत ॲशेस कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. पुनरागमन: ३५ व्या वर्षी याच मैदानावर दोन शतके झळकावून त्याने आपल्या कारकिर्दीला नवी उभारी दिली, त्यानंतर पुढच्या दोन वर्षांत त्याने ७ शतके ठोकली. उस्मान ख्वाजाची प्रभावी कारकीर्द – तपशील आकडेवारी एकूण कसोटी सामने ८७ (निवृत्तीच्या सामन्यासह ८८) एकूण धावा ६,२०६ सरासरी ४३.४९ शतके १६ अर्धशतके २८ विशेष सन्मान २०२३ चा ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिक्रिया – क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी ख्वाजाचे कौतुक करताना म्हटले की, “उस्मान हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एक अत्यंत विश्वासार्ह खेळाडू आहे. २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजयात त्याचा मोठा वाटा होता. त्याने अनेक तरुण खेळाडूंना प्रेरित केले आहे.”