Sonam Yeshey : क्रिकेट जगतात खळबळ! २२ वर्षीय गोलंदाजाचा टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Sonam Yeshey set world record in T20i cricket : क्रिकेटमध्ये सध्या विक्रमांचा पाऊस पडत असतानाच भूतानच्या एका तरुण गोलंदाजाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील क्रिकेटचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भूतानची २२ वर्षीय फिरकीपटू सोनम येशे (Sonam Yeshey) याने म्यानमारविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात अवघ्या ७ धावा देऊन ८ गडी बाद करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
सोनमचा भेदक मारा आणि नवा जागतिक विक्रम –
म्यानमारविरुद्धच्या या सामन्यात सोनम येशेच्या फिरकीसमोर प्रतिस्पर्धी फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. त्याने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात केवळ ७ धावा दिल्या आणि म्यानमारच्या ८ फलंदाजांना तंबूत धाडले.
Bhutan’s Sonam Yeshey scripts history, becomes first bowler to pick eight wickets in T20s
Read @ANI Story l https://t.co/gYYIiomCVb #SonamYeshey #BowlingRecord #T20Cricket #Bhutan pic.twitter.com/cchR2ehc9P
— ANI Digital (@ani_digital) December 29, 2025
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये) ८ विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी पुरुष टी-२० मध्ये मलेशियाच्या स्याजरुल इद्रुसने आणि बहरीनच्या अली दाऊदने प्रत्येकी ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. सोनमने या दोघांनाही मागे टाकत इतिहास रचला आहे.
भूतानने ठेवले होते १२८ धावांचे लक्ष्य –
प्रथम फलंदाजी करताना भूतानने २० षटकांत १२७ धावा केल्या. यामध्ये नामगे चेजे याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. त्याला नामगे थिनले (२७ धावा) आणि ताशी दोर्जी (१७ धावा) यांनी चांगली साथ दिली.
म्यानमारचा कोसळला डाव –
१२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना म्यानमारचा संघ सोनमच्या गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल दिसला. म्यानमारचा संपूर्ण संघ अवघ्या ४५ धावांवर सर्वबाद झाला. त्टेट लिन ओ (१२ धावा) आणि प्या फ्यो वाई (१० धावा) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
हेही वाचा – IND W vs SL W : भारतीय महिला संघाचा विजयी चौकार! श्रीलंकेचा धुव्वा उडवत टी-२० मालिकेत ४-० ने आघाडी
विजयाचा मोठा फरक –
सोनम येशेच्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर भूतानने हा सामना ८२ धावांनी जिंकला. केवळ २२ व्या वर्षी सोनमने केलेल्या या कामगिरीची दखल आता संपूर्ण क्रिकेट विश्वाने घेतली असून, असोसिएट देशांमधील क्रिकेटच्या वाढत्या प्रस्थाचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.





