US Open 2024 : बोपण्णा-एब्डेन जोडीची आगेकूच…

US Open 2024 : – दुहेरीत दुसऱ्या मानांकित असलेल्या भारताचा रोहन बोपण्णा व ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन (Rohan Bopanna-Matthew Ebden) यांच्या जोडीने नेदरलँडच्या रॉबिन हासे – सँडर अरेंड्स यांच्या जोडीला एकतर्फी पराभूत करताना यूएस ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत बोपण्णाने त्याच्या ऑस्ट्रेलियन साथीदारासह शानदार सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये बोपण्णा – एब्डेन यांनी दमदार खेळ करताना पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र नेदरलँडच्या रॉबिन हासे – सँडर अरेंड्स यांनी खेळात रंगात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बोपण्णा आणि एब्डेन यांच्या जोडीने 7-5 असा दुसरा सेट देखील जिंकताना स्पर्धेची पुढची फेरी गाठली.
पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत बोपण्णा आणि एब्डेन यांच्यासमोर स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना व अर्जेंटिनाच्या फेडेरिको कोरिया यांच्या जोडीचे आव्हान असणार आहे. हा सामना आज (शुक्रवार,30 आॅगस्ट) रात्री भारतीय प्रमाण वेळेनुसार 11.45 वाजता सुरू होईल.





