Wimbledon 2025 : रोहन बोपण्णाची निराशा, युकी भांबरीची धमाकेदार सुरुवात!

Wimbledon 2025 Updates : विम्बल्डन 2025 मधील बुधवार हा भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. यावेळी भारतीय टेनिस स्टार रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार सँडर गिल यांना पुरुष दुहेरी स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. या जोडीला तिसऱ्या मानांकित जर्मन जोडी केविन क्राव्हिएट्झ आणि टिम प्युट्झ यांच्याकडून एक तास आणि चार मिनिटांत 3-6, 4-6 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले, ज्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
युकी भांबरी आणि त्यांचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवे यांनी विंबलडन पुरुष युगल स्पर्धेत फ्रान्सच्या मॅन्युअल गुइनार्ड आणि मोनॅकोच्या रोमेन अर्नोडो यांचा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीचा सामना एक तास आणि 49 मिनिटे चालला, ज्यामध्ये 16व्या मानांकित भारतीय-अमेरिकन जोडीने अर्नोडो आणि गुइनार्ड यांचा 7-6, 6-4 असा पराभव केला.
भांबरी-गॅलोवेला पहिला सेट 7-5 ने जिंकण्याची संधी होती –
भांबरी संपूर्ण सामन्यात आक्रमक दिसला आणि गॅलोवेसोबत त्यानी उत्तम समन्वय साधला. त्यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. भांबरी आणि गॅलोवे यांच्याकडे प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस तोडण्याची आणि पहिला सेट 7-5 ने जिंकण्याची संधी होती, परंतु दोन सेट पॉइंट्स मिळूनही ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तरीही, त्यांनी कोणतीही चूक केली नाही आणि पहिला सेट जिंकला.
हेही वाचा – Wimbledon 2025 : १८ वर्षीय जोआओ फोंसेकाने रचला इतिहास, तिसऱ्या फेरीत मारली धडक
भांबरी-गॅलोवे दुसऱ्या फेरीत दाखल –
दुसऱ्या सेटमध्ये गुइनार्ड याला दुखापत झाली तो पाठ आणि मान धरून खाली पडला, पण त्यानी लढा सुरू ठेवला. मात्र, भांबरी-गॅलोवे यांनी आपल्या रणनीतीवर ठाम राहून सामना जिंकला. ऋत्विक बोल्लीपल्ली आणि एन. श्रीराम बालाजी हे अन्य दोन भारतीय खेळाडू आहेत, जे विंबलडनमध्ये अनुक्रमे रोमानियाच्या निकोलस बॅरिएंटोस आणि मेक्सिकोच्या मिगुएल रेयेस-वरेला यांच्यासोबत खेळतील.





