पुणे | आमदार नियुक्तीवरून राष्ट्रवादीत खदखद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महायुतीकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी हालचाली सुरू आहेत. त्यात ६ जागा भाजपला तर प्रत्येकी ३ जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने त्यावरून पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे.
पक्षाच्या प्रवक्त्या अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी थेट सोशल मीडियावर पक्षाने एक व्यक्ती एक पद हे धोरण अवलंबून सर्व महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली आहे.
पक्षाकडून पुण्यात शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यासह अनेक पदाधिकारी इच्छूक आहेत. मात्र, त्यांना नावही देण्याची संधी न देता अशा प्रकारे नियुक्ती केली जाऊ नये, अशी मागणी पाटील यांंनी केली आहे. याबाबत चाकणकर यांनी बोलण्यास नकार दिला असून पक्षाकडून भूमिका जाहीर केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी अनेक पदाधिकारी इच्छूक आहेत. पक्षाकडून सर्वांचाच विचार व्हावा, जी नावे चर्चेत आहेत ती पाहता एकाच व्यक्तीला किती पदे देणार, असा प्रश्न आहे. शहरात अनेक महिला पदाधिकारी चांगले काम करतात,
त्यांनाही संधी देणे आवश्यक असल्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. एक व्यक्ती एक पद या धोरणानुसारच निर्णय घेतले जावेत. पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार या मागणीला न्याय देतील.- अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे, पक्ष प्रवक्त्या
आमदार नियुक्तीसंदर्भात आपल्याला काहीही कल्पना नाही. हा सर्व पक्षाचा विषय आहे. वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. पक्षाकडूनच त्याबाबत भूमिका जाहीर केजी जाइल, त्यामुळे याबाबत पक्ष चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करतील. – रूपाली चाकणकर, अध्यक्ष, महिला आयोग





