‘कॅग’च्या अहवालावरून दिल्ली विधानसभेत गदारोळ; आतिशी यांच्यासह ‘आप’चे 21 आमदार निलंबित

नवी दिल्ली : मंगळवारी दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मद्द धोरणावरील कॅगचा अहवाल मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सभागृहात सादर केला. या अहवालात ‘आप’ सरकारच्या शीशमहल, मोहल्ला क्लिनिक, मद्य धोरणासह आदी महत्वाच्या गोष्टी मांडण्यात आल्या. दिल्लीत ‘आप’ सरकार सत्तेत असताना मद्य धोरणाच्या अंमलबजावणीमुळे तब्बल २००२ कोटींचा महसूल बुडाल्याचा दावा, मुख्यमंत्री गुप्ता यांनी केल्यानंतर आपच्या आमदारांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला.
त्यानंतर, आपच्या २१ आमदारांना तीन दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्यात आल्याने अधिवेशनाचा तिसरा दिवस चांगला गाजला. दरम्यान, दिवसाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री भवनात भगतसिंग आणि डॉ.आंबेडकरांच्या छायाचित्रांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष ‘आप’ने सभागृहात गोंधळ घातला. नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना भाषण देत असताना आपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. यानंतर, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये विरोधी पक्षनेत्या आतिशींचाही समावेश होता.
४००४ कोटी रुपयांचे नुकसान झाले- सिरसा
कॅगच्या अहवालावर दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मित्रांना मद्याचा व्यवसाय दिल्याने सुमारे ४००४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केजरीवालांनी त्यांच्या अपात्र मित्रांना मोठ्या कंपन्यांमध्ये १%-१% भागीदारी देऊन कंत्राट मिळवले. केजरीवाल यांनी १० वर्षांपासून लपवून ठेवलेले सर्व घोटाळे कॅगच्या अहवालात उघड झाले आहेत.
अहवालातील ठळक मुद्दे…
- मद्य धोरण बदलल्याने २ हजार ६८ कोटींची महसुली तूट
- मद्य परवाने देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचेही नमूद
- नव्या धोरणामुळे मद्य विक्रेत्यांचा नफा ५ वरुन १२ टक्के झाला
- मद्य विक्रीचे परवाने देताना छाननी योग्य प्रकारे करण्यात आली नाही
- नव्या मद्य धोरणाबाबत तज्ञ समितीच्या अहवालाकडे सपशेल दुर्लक्ष
- नव्या मद्य धोरणानुसार एका व्यक्तीला ५४ दुकाने चालवण्याची मुभा मिळाली
- नव्या धोरणानुसार कंपन्यांनी एकाच व्यापाऱ्याला माल विकावा अशी तरतूद
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विधानसभेत घोषणाबाजी केल्यानंतर आपच्या आमदारांना निलंबित करण्यात आले. मात्र, भाजप आमदारांनी पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या तेव्हा, काहीही बोलले गेले नाही. याचा अर्थ भाजप डॉ. आंबेडकरांचा द्वेष करते. मुख्यमंत्री भवनातून भगतसिंग आणि डॉ.आंबेडकरांचे फोटो का काढून टाकण्यात आले? पंतप्रधान मोदी हे डॉ.आंबेडकरांपेक्षा मोठे आहेत का?
-आतिशी, माजी मुख्यमंत्री





